खबरदार... वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालाल तर!

अनिल कांबळे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नागपूर - अनेकदा वाहतूक पोलिस कारवाई करताना वाहनचालक त्यांच्याशी हुज्जत घालतात. काही शिवीगाळ करतात, बड्या नेत्यांची नावे सांगून दमदाटी करतात. काही वेळा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्लेसुद्धा झाले आहेत. त्यामुळे असे प्रकार घडू नये म्हणून  नागपूर वाहतूक पोलिसांच्या वर्दीवर लवकरच बॉडी स्पाय कॅमेरा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडू शकते. 

वाहतूक पोलिसांना मारहाण आणि शिवीगाळ करण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये महिलाही आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.  वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे पोलिसबळ यांचा परिणाम वाहतूक सुव्यवस्था आणि नियमनावर होत आहे. त्यातूनही वाहतूक नियम  मोडणांऱ्यावर पोलिस कारवाई करतात. त्या वेळी काहीजण पोलिसांना छुटपूट राजकीय नेते, नगरसेवकांना फोन करून धमकविण्याचा प्रयत्न करतात. काहींची मजल तर शिवीगाळ आणि मारहाण करण्यापर्यंत जाते. स्वयंचलित सिग्नलवर वाहतूक पोलिसांची गरज नसते; परंतु अशा ठिकाणी नियम मोडले जातात. एखाद्या वाहनचालकाला थांबण्याचा इशारा केला, तर तो पळून जातो. असे प्रकार रोखण्यासाठी आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटणाऱ्या वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिस आता बॉडी स्पाय कॅमेऱ्याचा वापर करणार आहेत.

कारवाईतील पारदर्शकता वाढेल
शहरात हेल्मेट सक्‍ती, ब्लॅक फिल्म आणि वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका वाहतूक पोलिस करीत आहेत. मात्र, काही वाहनधारक पोलिसांवर चिरीमिरी मागितल्याचा वायफळ आरोप करतात. मात्र, बॉडी स्पाय कॅमेरा असल्यास वाहतूक पोलिसांची कार्यप्रणाली पारदर्शक असेल. तसेच पोलिसांवरील आरोप करण्याची प्रथाही बंद होईल.

कसा आहे बॉडी कॅमेरा? 
बॉडी स्पाय कॅमेरा वाहतूक पोलिसांच्या वर्दीच्या पुढच्या बाजूला असतो. त्यावर कारवाई करताना वाहतूक पोलिस व समोरच्या व्यक्तीचे संभाषण, चित्रीकरण रेकॉर्ड होते. त्यामुळे पोलिसांसोबत होणारे गैरवर्तनाचे प्रकार टाळता येतील. या कॅमेऱ्यांवर पोलिस उपायुक्‍त कार्यालयातून नियंत्रण असेल. आवाज, चित्र आणि शूटिंग होत असल्यामुळे हुज्जत घालणाऱ्याविरुद्ध सबळ पुरावा पोलिसांकडे असेल.