१४ हजारांचा टायर खरेदी केला ३५ हजारांत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

नागपूर - महापालिकेकडे असलेल्या वाहनांसाठी टायर, बॅटरी आदी साहित्य खरेदीत दोन वर्षांत एक कोटीचा घोटाळा उघडकीस आला आहे.

नागपूर - महापालिकेकडे असलेल्या वाहनांसाठी टायर, बॅटरी आदी साहित्य खरेदीत दोन वर्षांत एक कोटीचा घोटाळा उघडकीस आला आहे.

महापालिकेच्या कारखाना विभागाने टायर दुपटीने खरेदी केले. बॅटरी, डिझेल फिल्टर आदी सुटे भागाच्या खरेदीसाठीही बाजारभावाच्या तुलनेत आठपट दर दिल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांनी केला.
जेएनएनयूआरएम अंतर्गत प्रकल्पांसाठी काढलेल्या दोनशे कोटींच्या कर्जावर २१२ कोटींचे व्याज देण्याचा आरोप करीत याप्रकरणी चौकशीची मागणी करणारे संदीप सहारे यांनी मंगळवारी (ता. पाच) कारखाना विभागातील भ्रष्टाचारावर संताप व्यक्त केला. महापालिकेत कार, ट्रक, जीप, जेसीबी असे एकूण २०१ वाहने आहेत. या वाहनांची देखभाल तसेच टायर, ट्यूब, बॅटरी, स्पेअर पार्टस निकामी झाल्यास नवीन खरेदी करून लावण्याची जबाबदारी कारखाना विभागावर आहे.

महापालिकेने २६ प्रतिष्ठाने तसेच दुकाने साहित्य खरेदीसाठी निश्‍चित केली आहे. त्यांच्याकडूनच टायर, ट्यूब, बॅटरी, सुटे भाग खरेदी करण्यात येतात. या विभागाने २०१५-१६ या वर्षात ९८ लाख चार हजार ९०९ रुपयांचे साहित्य खरेदी केले. २०१६-१७ या वर्षात एक कोटी ३३ लाख ३८ हजार ७६८ रुपयांचे टायर, सुटे भाग खरेदी केले. मात्र, कारखाना विभागाने निश्‍चित केलेल्या दुकानांतून खरेदी केलेल्या टायरसाठी बाजारभावाच्या तुलनेत दुपटीपेक्षाही जास्त रक्कम दिल्याचा आरोप सहारे यांनी केला.

टाटा कंपनीच्या ईएक्‍स-२५१५ या वाहनासाठी एमआरएफ कंपनीचा टायर कारखाना विभागाने  ३५ हजार ९५९ रुपयांत खरेदी केला. परंतु, बाजारातील एमआरएफच्या शोरूममध्ये याच  टायरची किंमत १४ हजार ८०० रुपये आहे.

एमआरएफ रेडियल टायर ८५ हजार ४५६ रुपयांत खरेदी केला असून, बाजारातील शोरूममध्ये १८ हजार ४०० रुपये किंमत असल्याचे सहारे यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे टाटा सुमोसाठी १२ व्होल्टच्या बॅटरीची किंमत बाजारात ५ हजार ३९० आहे, मात्र कारखाना विभागाने १८ हजार ५०० रुपयांत खरेदी केल्याचे देयके सादर करून मंजूर केली आहेत. याशिवाय जेसीबी, एक्‍स्कॅव्हेटर, टाटा हिताची, टाटा-६०८, टाटा-७०९, टाटा-एक्‍स-२५१५, टाटा सुमो, टाटा २०७ आदी वाहनांच्या सुटे भागाच्या खरेदीतही हाच प्रकार असल्याचे सहारे म्हणाले.

बॅटरीसाठी अडीचपट मोजले 
जेसीबीला लागणारी १२ व्होल्टची बॅटरीची किंमत बाजारात १२ हजार सातशे रुपये असताना २९ हजार ५२७ रुपयांत खरेदी केली. बाजारात ६०० रुपये किमतीचे डिझेल फिल्टर पाच हजार  ८४२ रुपयांत खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला.

कारखाना विभागाने खरेदी केलेले साहित्य व बाजारभावातील शोरूम व दुकानांमधील साहित्याच्या दरात मोठी तफावत आहे. या भ्रष्टाचारात सहभागी विभागप्रमुख तसेच यांत्रिकी अभियंत्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई करावी.
- संदीप सहारे, ज्येष्ठ नगरसेवक, काँग्रेस

Web Title: nagpur news tyre purchasing scam