शहरात अनधिकृत बांधकामाला अभय 

शहरात अनधिकृत बांधकामाला अभय 

नागपूर - एकीकडे रस्त्यांवरील गरीब दुकानदारांचे अतिक्रमण हटविण्यासाठी तत्पर असलेल्या महापालिकेच्या झोन सहायक आयुक्ताने दोन वर्षांपासून तक्रार करून देखील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी आशीनगर झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांना कारणे दाखवा बजावली. स्पष्टीकरणासह बुधवारी, २२ रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी केल्या आहेत. 

आशीनगर झोनमध्ये शून्यकुमार टेंभूर्णे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी आशीनगर झोनच्या सहायक आयुक्तांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी दोन वर्षापूर्वी १६ नोव्हेंबर २०१५ रोजी संबंधित अनधिकृत बांधकामधारकास नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नेहमीप्रमाणे आशीनगर झोन सहायक आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार केली. अतिरिक्त आयुक्तांनी याप्रकरणी अहवाल मागितला. अहवालात दोन वर्षांपूर्वी अनधिकृत बांधकामधारकास नोटीस बजावण्यात आली, परंतु त्यानंतर अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत कुठलीही कारवाई सहायक आयुक्तांनी केली नसल्याचे पुढे आले. एवढेच दंडाची वसुलीकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांना आढळून आले. याप्रकरणी सहायक आयुक्त हुमणे यांना अनेकदा कारवाईच्या सूचना करण्यात आल्या. परंतु वरिष्ठांच्या सूचनांनाही गांभीर्याने घेण्याचे हुमणे यांनी टाळले. त्यामुळे आज अतिरिक्त आयुक्त कुंभारे यांनी सहायक आयुक्त हुमणे यांना कारणे दाखवा बजावत २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्पष्टीकरणासह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी हुमणे यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. हुमणे यांना तीन महिन्यांचा कारावास किंवा २० हजारांचा दंडही होऊ शकते, असे महापालिकेतील सुत्राने नमुद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com