भिंत अंगावर पडल्याने 9 मजूर दबले 

भिंत अंगावर पडल्याने 9 मजूर दबले 

नागपूर - नव्या बहुमजली इमारतीचा पाया रचण्यासाठी तयार करण्यात आलेली भिंत तेथे काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडली. या भिंतीखाली 9 मजूर दबले. यातील चार जण किरकोळ जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. या घटनेने विवेकानंदनगरात खळबळ माजली. 

विवेकानंदनगरात डॉ. सुधीर पुनावार यांच्या मालकीच्या हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे. त्यांनी प्रदीप जैन यांच्या महालक्ष्मी डेव्हलपर्सला बांधकामाचे कंत्राट दिले आहे. येथे इमारतीचा पाया रचण्याचे काम सुरू आहे. पाया रचताना पावसाळ्यामुळे लवचिक झालेली माती खचून जाऊ नये, यासाठी कालपासून भिंत बांधण्याचे काम सुरू होते. या भिंतीची उंची जवळपास सहा फूट होती. सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास येथे नऊ मजूर काम करीत होते. त्यांच्या अंगावर ही भिंत पडली. यातील पाच जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांच्या डोक्‍याला लागल्याचे समजते. यात हेमराज टेंभूर्णे, दिनेश नामदेव पेंटर (वय 40, रा. नागपूर), सुनील उके (वय 20, नागपूर) मन्सूलाल भोपा (वय 18) आणि मन्तू शिलू (वय 24) दोघेही रा. ब्रम्हाडोह-रामपूर, छिंदवाडा (मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. किरकोळ जखमींमध्ये राजन दरशिम्हा (वय 18, छिंदवाडा, मध्य प्रदेश), रवींद्रनाथ विश्‍वनाथ धुर्वे (47, उदयनगर, नागपूर) विनोद शिलू (18, रा. छिंदवाडा-मध्य प्रदेश) आणि सूरजन सिंग (वय 18, छिंदवाडा, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. भिंतीच्या मलब्याखाली दबून नऊही मजूर दबल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी पोलिस व अग्निशमन विभागाला कळविले. पोलिस व अग्निशमन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, अन्य मजुरांनी आणि ठेकेदारांनी तातडीने मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. 20 मिनिटांच्या कालावधीत मलबा हटवून सर्वच मजुरांना ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाच जणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तर, अन्य चौघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. 

मजुरांना नव्हते हेल्मेट आणि गमबूट 
शहरात शेकडो बहुमजली इमारतींचे काम सुरू असून हजारो मजूर काम करीत आहेत. मात्र, बांधकामांच्या ठिकाणी ठेकेदार मजुरांना हेल्मेट आणि गमबूट देत नाहीत. त्यामुळे धोकादायक स्थितीत मजूर जीव धोक्‍यात टाकून काम करतात. या बाबीकडे कोणत्याच शासकीय विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे आजही अनेकांचे जीव धोक्‍यात आहेत. 

दलदलमुळे पडली भिंत 
इमारतीचे बेसमेंट तयार करण्यासाठी जवळपास 15 फुटांचा खड्‌डा खोदण्यात आला होता. जमिनीपासून संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. मात्र, भिंतीच्या मागच्या बाजूला सिव्हेज लाइन्स असून ती झिरपत होती. त्यामुळे संरक्षण भिंतीजवळ दलदल निर्माण झाली होती. त्या दलदलीमुळे मातीचा ढीग भिंतीवर घसरला. मातीच्या भारामुळे भिंत कोसळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com