महापालिकेच्‍या पाच सहआयुक्तांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नागपूर - पावसाळ्यापूर्वी नाले आणि पावसाळी नाल्यांच्या सफाईची माहिती सादर न करणाऱ्या महापालिकेच्या पाच झोनच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. यामुळे कामातील दिरंगाई अधिकाऱ्यांना चांगलीच भोवणार असल्याचे दिसून येते. 

नागपूर - पावसाळ्यापूर्वी नाले आणि पावसाळी नाल्यांच्या सफाईची माहिती सादर न करणाऱ्या महापालिकेच्या पाच झोनच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. यामुळे कामातील दिरंगाई अधिकाऱ्यांना चांगलीच भोवणार असल्याचे दिसून येते. 

महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी नोटीस बजावली. पावसाळापूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बुधवारी (ता. ७) बैठकी घेण्यात आली. यात कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यापुढील कामाची डेडलाइन ठरवून देण्यात आली. त्यानुसार संबंधित झोनअंतर्गत येणाऱ्या ज्या-ज्या नाल्यांची साफसफाई झाली आहे, त्याची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांनी दिले होते. या आदेशानुसार केवळ चार झोनमधील अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र सादर केले. एका झोनमधील सहायक आयुक्त रजेवर असल्याने ते प्रमाणपत्र सादर करू शकले नाही. उर्वरित पाच झोनमधील सहायक आयुक्तांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आज कारवाईचा बडगा उगारण्यात आला. लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त आर. पी. भिवगडे, नेहरूनगर झोनचे राजेश कराडे, लकडगंज झोनचे सुभाष जयदेव आणि मंगळवारी झोनचे हरीश राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियममधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करून आपली एक वेतनवाढ पुढील एक वर्षाच्या कालावधीकरिता का थांबविण्यात येऊ नये, याबाबत आपण आपले स्पष्टीकरण तीन दिवसांच्या आत सादर करावे, असे या नोटिशीत म्हटले आहे.

भिवगडेंनी केली दिशाभूल
हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त आर. पी. भिवगडे यांनी दिलेल्या प्रमाणपत्रातून महापौर  आणि आयुक्तांची दिशाभूल केल्याचे लक्षात आले. गुरुवारी आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांनी संबंधित माहितीच्या आधारे हनुमाननगर झोनमध्ये दौरा केला असता, भिवगडे यांनी सादर केलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे लक्षात आले. ही बाब गंभीर असल्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे.