देशाच्या विकासासाठी कार्यरत राहणार : गडकरी 

Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : जीवनात अपमान, उपेक्षा सहन केल्या. आज जे मिळाले आहे, त्याची कधीही अपेक्षा केली नाही. व्यक्‍तीच्या जीवनात देश सर्वोच्च असून, या देशासाठी खूप काम करायचे आहे. या देशातील मजूर, गरीब जनतेसाठी काम करायचे आहे, असे उद्‌गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी षष्ट्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळ्यात बोलताना काढले. 

नागपूर येथील चिटणीस पार्क मैदानावर शनिवारी आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 

या वेळी पवार आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जे नेते राजकारणात यायचे, ते एका चौकटीत राहून काम करायचे. मात्र, या चौकटीला छेद देण्याचे काम गडकरी यांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांसाठी त्यांनी काम केले, कधीही कशाची पर्वा केली नाही. 

''माझ्यात आणि गडकरी यांच्यात एकच फरक आहे आणि तो म्हणजे, मी आधी विचार करतो, सल्ला घेतो, नंतरच निर्णय घेऊन बोलतो. मात्र, गडकरी निर्णय घेतला की जाहीर करतात आणि त्याची अंमलबजावणी करतात,'' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. 

शिंदे म्हणाले, की गडकरींनी मला खूप छळले आहे. ते दिसतात तसे साधे नाहीत. ते कलाकार आहेत. विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी एक दिवस अधिवेशन बंद पाडले होते. आपल्या विभागाकरिता वाट्टेल ते करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांना आणखी मोठे पद मिळेल, असे वाटत होते; पण झाले उलटेच. शेवटी नशिबात जे असते तेच घडते. त्यांना भविष्यात मोठे पद मिळो! 

आठवले यांनी खुमासदार शैलीत भाषण केले. ''निवडणुकीच्या काळात एकमेकांचे तोंड न पाहणारे नेते आज एकत्र आले आहेत. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. राजकारणात हवा ज्या दिशेने आहे, त्या दिशेने जावे लागते. कधीकाळी मी कॉंग्रेसकडे होतो, आज भाजपकडे आहे. जो राजकारणाची हवा ओळखत नाही, तो यशस्वी होत नाही, असे आठवले म्हणाले. 

गडकरी देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांचे लाडके नेते आहेत. ते केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा विकास करत असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या वेळी म्हणाले. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम गडकरी करत आहेत, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती, अशी भावना छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी व्यक्‍त केली. 

या कार्यक्रमाला अमित शहा, श्री श्री रविशंकर आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे अनुपस्थित होते. मात्र, रविशंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गडकरींना शुभेच्छा दिल्या. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com