सकाळ @ फुटाळा चौपाटी

सकाळ @ फुटाळा चौपाटी

तरुणाईचे डेस्टिनेशन असलेली आणि रात्री बारापर्यंत जागी असलेली फुटाळा चौपाटी सकाळी पुन्हा सहालाच जागी झाली होती. संध्याकाळपासून तरुणांच्या उत्साही गर्दीने ओसंडणाऱ्या या रस्त्यावर सकाळी सहाला मात्र मध्यमवयीन गर्दी दिसत होती. चौपाटीच्या फुटपाथलगत अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहने रांगेत पार्क केली होती. मोकळ्या रस्त्यावर ट्रॅक सूट, स्पोर्टस शूज परिधान केलेले पुरुष आणि महिला तलावावरून येणारे थंड प्रसन्न वारे अंगावर घेत मॉर्निंग वॉक करीत होते. एकत्र मॉर्निंग वॉक करणाऱ्या मित्रांचा समूह हास्यविनोद करीत चालला होता. तर एकटे फिरणारे काही जण कानात इअर फोन लावून संगीताचा आनंद घेत होते. काही मध्यमवयीन जोडपीही संसाराच्या सुखदु:खाची चर्चा करीत फिरत होती. काही विशी-बाविशीचे तरुण जॉगिंग करीत होते. इतक्‍यात डोक्‍यावर हेल्मेट लावलेला तरुण-तरुणींचा घोळका मोकळ्या रस्त्यावर रेसिंग सायकल दामटत पुढे निघाला. 

तलावाच्या विरुद्ध दिशेला असलेले हॉटेल्स, फास्टफूड-जंकफूडचे ठेले, आईस्क्रीम पार्लर्स अजून बंद होते. रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना सेवा दिल्याच्या खुणा हॉटेल्स आणि ठेल्यांच्या आजूबाजूला विखुरल्या होत्या. रस्त्यालगतच्या कचराकुंड्या भरून वाहात होत्या. माणसांनी रात्री पोट भरल्यावर अर्धवट खाऊन टाकलेल्या खाद्यपदार्थांवर सकाळी उपाशी कुत्री ताव मारत होती. चहाचे एक-दोन ठेले मात्र ग्राहकांच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याच्या तयारीत होते. चहावाल्याने जोर लावत स्टोव्हला पंप मारला आणि चहाचे आंधण ठेवलेला स्टोव्ह धगधगू लागला. पाण्याला उकळी आली तशी चहावाल्याने स्वच्छ धुतलेल्या ठेल्यावर ओळीने रचून ठेवलेल्या डब्यातील चहा-साखर त्यामध्ये घातली. आणि विशिष्ट रिदम निर्माण करीत तो खलबत्त्यात आले-विलायची कुटू लागला. दुसऱ्या स्टोव्हवर मोठ्ठे पातेले ठेवून त्याने त्यामध्ये झोकात दुधाचे पुडे रिकामे केले. कुटलेले आले आणि विलायची चहामध्ये टाकताच चहाचा सुगंध दरवळला. मोठ्ठ्या पळीने तो चहा जसजसा ढवळू लागला तशी मॉर्निंग वॉक करणारी गर्दी ठेल्याभोवती गोळा होऊ लागली. रोजच्या गिऱ्हाइकांशी चहा गाळता-गाळता त्याच्या गप्पाही रंगल्या. ॲल्युमिनियमच्या स्वच्छ केटलीतून त्याने चहा पेल्यांमध्ये ओतला आणि पायी फिरून दमलेली चहाची दर्दी गर्दी घाम पुसत त्या अमृततुल्य चहाचा आस्वाद घेऊ लागली. 

चहाच्या ठेल्याजवळून तलावाचा नजारा रमणीय दिसत होता. उगवत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात तलावातले पाणी चमकत होते. आपल्या पिलांसह बदके जलविहार करीत होती. हिरव्या लुसलुशीत पानांवर उमललेली पांढरी कमळे तलावाचे सौंदर्य वाढवीत होती. काठावरच्या दगडी भिंतीवर काही मासेमार पाण्यामध्ये गळ टाकून बसले होते. काठाच्या आजूबाजूला मात्र प्रचंड घाणीचे साम्राज्य होते. काठालगत पाण्यात कचरा साचला होता. पाण्याला दुर्गंधी येत होती. काठावर दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. एक मनपा कामगार हातात लांब झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत होता. हजारो हातांनी केलेली घाण केवळ दोन हातांनी स्वच्छ करणे शक्‍यच नाही, तर दुरापास्तही आहे. जबाबदार आणि सुजाण नागरिकांना कधीतरी याचे भान येऊन सार्वजनिक ठिकाणची अस्वच्छता नाहीशी होईल, या आशेसह.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com