'दीड महिन्यात मेट्रो रेल्वेची ट्रायल'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - नागपूर मेट्रो रेल्वेच्या निमित्ताने फाइव्ह- डी तंत्रज्ञानाचा वापर भारतात प्रथमच होत असून, कामाला गती आली आहे. पुढील दीड महिन्यात मेट्रो रेल्वेची ट्रायल घेणेही शक्‍य झाल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे वेळ व पैशाची बचत होत असून, कामाचा दर्जाही सर्वोच्च राहणार आहे.

नागपूर - नागपूर मेट्रो रेल्वेच्या निमित्ताने फाइव्ह- डी तंत्रज्ञानाचा वापर भारतात प्रथमच होत असून, कामाला गती आली आहे. पुढील दीड महिन्यात मेट्रो रेल्वेची ट्रायल घेणेही शक्‍य झाल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे वेळ व पैशाची बचत होत असून, कामाचा दर्जाही सर्वोच्च राहणार आहे.

फाइव्ह- डी तंत्रज्ञानासाठी बेंटले सिस्टिम्स ही अमेरिकन कंपनी सहकार्य करीत आहे. मेट्रो रेल्वेच्या पायाभूत कामांसाठी ही कंपनी सॉफ्टवेअर पुरवित आहे. गुगल तसेच मायक्रोसॉफ्टच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरसाठी सॉफ्टवेअर पुरविणारी ही कंपनी प्रथमच भारतात आल्याचे दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फाइव्ह- डी तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरमुळे मेट्रो रेल्वेची एकाचवेळी होणाऱ्या वेगवेगळ्या कामांचे डिझाइन तत्काळ तयार करण्यास मदत होत आहे. स्मार्ट थ्री-डी,फोर-डी  आणि फाइव्ह- डी या तिन्ही तंत्रज्ञानाचा प्रथमच एकत्र वापर करून मेट्रो रेल्वेचे काम करण्यात  येत आहे. जगात प्रथमच तीन तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाने कामे करण्यात येत असल्याचे दीक्षित म्हणाले. यापूर्वी कुठलाही प्रकल्प साकार होताना सर्वप्रथम कार्यालय, त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यानंतर प्रकल्पाचे डिझाइन कागदावर तयार केले जात होते. त्यामुळे प्रकल्प सुरू व्हायलाच दहा वर्षांचा काळ लागत होता. 

परंतु, आज संगणकीय माध्यमाने कामे  सोपे झाले आहे. मेट्रो रेल्वेचे काम वेळेत, प्रकल्पाच्या किमतीवर नियंत्रण ठेऊन उच्च दर्जाचे करणे मोठे आव्हान होते. परंतु, आयटीमुळे ते सहज सोपे झाले असून, तंत्रज्ञानाच्या एकत्र वापरामुळे आज मेट्रो प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेला बेंटले सिस्टिम्सचे औद्योगिक व्यवस्थापक स्टिव्ह कॉकरेल, महाव्यवस्थापक वित्त अनिल कोकाटे, महामेट्रोचे शिरीष आपटे होते. 

मनीषनगर उड्डाणपुलात बदल 
मनीषनगर येथील उड्डाणपुलाच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या डिझाइनमुळे उज्ज्वलनगरातील १४ नागरिकांची घरे या प्रकल्पात जाणार होती. त्यांनी विरोध केला. ही जागा अधिग्रहण करण्यासाठी मोठा कालावधी लागला असता. त्यामुळे प्रकल्प रेंगाळण्याची भीती होती. नव्या डिझाइनअंतर्गत तयार होणाऱ्या उड्डाणपुलावरून आता केवळ दुचाकी वाहने व कारलाच परवानगी राहणार असून, जडवाहनांना फिरून वर्धा मार्गावर यावे लागणार आहे.

रशियावरून येणार ट्रॅक
मेट्रो रेल्वेसाठी वेगळ्या प्रकारच्या टणक लोखंडाचे ट्रॅक वापरले जाणार आहे. या ट्रॅकचे आयुष्यमानही दीर्घ असते. हे ट्रॅक रशियावरून मागविण्यात आले असून, मुंबईच्या पोर्टवर आले आहेत. येत्या चार दिवसांत हे ट्रॅक नागपुरात येतील, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.