पादचाऱ्यांना पार्किंग, वीज रोहित्रांचे अडथळे

राजेश प्रायकर 
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - महापालिकेची उदासीनता आणि धोरणाच्या अभावी शहरातील फूटपाथ असूनही पादचाऱ्यांसाठी नसल्यासारखेच झाले आहे. शहरातील फूटपाथवर दुकाने, खासगी शिकवणी वर्गाची पार्किंग आहे. काही ठिकाणी फूटपाथवरच अनेक वर्षांपासून वीज रोहित्र असून, सिव्हिल लाइन्ससारख्या भागात महापालिकेनेच सौंदर्यीकरण करून पादचाऱ्यांच्या हक्‍कावरच गदा आणली आहे.

नागपूर - महापालिकेची उदासीनता आणि धोरणाच्या अभावी शहरातील फूटपाथ असूनही पादचाऱ्यांसाठी नसल्यासारखेच झाले आहे. शहरातील फूटपाथवर दुकाने, खासगी शिकवणी वर्गाची पार्किंग आहे. काही ठिकाणी फूटपाथवरच अनेक वर्षांपासून वीज रोहित्र असून, सिव्हिल लाइन्ससारख्या भागात महापालिकेनेच सौंदर्यीकरण करून पादचाऱ्यांच्या हक्‍कावरच गदा आणली आहे.

फूटपाथ तयार करताना महापालिका व महावितरणमध्ये समन्वयच नसल्याने वीज रोहित्र, खांब पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. भोले पेट्रोलपंप ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर एका बाजूने महापालिकेने फूटपाथवरच सौंदर्यीकरण केले आहे. एकीकडे नागरिकांसाठी फूटपाथ सोडायचे अन्‌ त्यावरच सौंदर्यीकरण करायचे, अशी महापालिकेची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका सामान्य नागरिकांसाठी की अधिकाऱ्यांना सौंदर्यीकरण करून गारवा देण्यासाठी आहे? असा प्रश्‍न पादचारी उपस्थित करीत आहेत. 

चिटणीस पार्क परिसरात गर्दी 
महाल येथील चिटणीस पार्क येथे अनेक कार्यक्रम होतात. परंतु, येथे व्यवस्था नसल्याने फूटपाथवरच पार्किंग केली जाते. भरीस भर या चौकातून अग्रसेन चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर जुन्या दुचाकी विक्रीची दुकाने असून, सर्व दुचाकी फूटपाथवर उभ्या असतात. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालावे लागत असल्याने वाहतुकीची कोंडी या परिसरात नित्याचाच भाग झाला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा  लागत असल्याचे येथील रहिवासी सचिन पाटणकर यांनी सांगितले.

वस्त्यांमधील फूटपाथ गायब 
अनेक वस्त्यांमध्ये खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्यांनी फूटपाथ विद्यार्थ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी वापरात आणले आहे. खानखोजेनगर, भांडे प्लॉट, दत्तात्रयनगरसह अनेक भागांत विद्यार्थ्यांच्या वाहनांमुळे नागरिकांना फूटपाथऐवजी रस्त्यांवरून चालावे लागत आहे. वस्त्यांतील रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी पळविण्याच्या प्रकार वाढण्याच्या अनेक कारणांपैकी फूटपाथ मोकळे नसणे हेही एक कारण असल्याचे बालाजीनगरातील जगदीश पाटमासे यांनी सांगितले. मंदिर, मैदानांच्या चारही बाजूने फूटपाथवर नागरिकांनीच वाहनांसाठी शेड तयार केले आहे.