भाजपकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा  - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नागपूर - कर्जमाफीचा निर्णय व्हायच्या अगोदरच भाजपकडून श्रेय घेण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्याचा प्रकार किळसवाणा असून हतबल शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना केला.

नागपूर - कर्जमाफीचा निर्णय व्हायच्या अगोदरच भाजपकडून श्रेय घेण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्याचा प्रकार किळसवाणा असून हतबल शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी त्या अमरावती येथे आल्या आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही प्रश्‍नावर अभ्यास सुरू असल्याचे पालुपद लावतात. कर्जमाफीबद्दल अजूनही कोणताही आदेश आलेला नाही. बॅंकांना कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांना 10 हजार रुपये अग्रीम देण्यास बॅंक तयार नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही व 10 हजार रुपयांची मदतही मिळालेली नाही. सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नसताना सरकारचे अभिनंदन करणारे पोस्टर्स मात्र राज्यभर रस्त्यारस्त्यांवर लागले आहेत. एखाद्या निर्णयाचा श्रेय घेण्याचा हा प्रकार फारच किळसवाणा आहे. राज्यातील हतबल असलेल्या शेतकऱ्यांची एवढी क्रूर थट्टा आतापर्यंत कुणीही केली नाही, असेही त्या म्हणाल्या.

तूर खरेदी करण्यात राज्य सरकारचा अभ्यास कमी पडल्याचे सांगून त्या म्हणाल्या, सरकारने तूर खरेदीसाठी कोणतीही व्यवस्था केली नाही. अजूनही शेतकऱ्यांकडे तूर पडून आहे. मुख्यमंत्री मात्र थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यावधी निवडणुकांच्या शक्‍यतांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचा प्रकार दुर्दैवी राहील परंतु तशी वेळ आल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.