१,१०० वाहनांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

कारवाई आकड्यात
नो पार्किंग :            ५१८
वन वे :                  २१९
हेल्मेट :                    ६४
ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह :      २
ई-चालान :            २७१

नागपूर - चोवीस तास गर्दीने गजबजलेला धंतोली परिसर सध्या मोकळा श्‍वास घेत आहे. पोलिस आयुक्‍तांनी येथील तब्बल २० मार्ग ‘नो पार्किंग’ झोन आणि चार मार्ग ‘वन वे’ केल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. वाहतूक शाखेने गेल्या दोन दिवसांत तब्बल १,१४० वाहनचालकांवर कारवाई केली. जनजागृतीनंतरही वाहनचालक सुधारत नसल्याने पोलिसांनी कारवाईसाठी विशेष मोहीम सुरू केली. 

‘सकाळ’ने धंतोलीतील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर वृत्तमालिका प्रकाशित करून पोलिसांसह मनपाचे लक्ष वेधले होते. पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी या वृत्तमालिकेची गांभीर्याने दखल घेऊन सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी धंतोलीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची योजना आखली. धंतोलीतील २० ठिकाणी नो पार्किंग झोन तर चार मार्ग ‘वन-वे’ करण्यात आले. धंतोलीत अनेक हॉस्पिटल्स, दुकाने, शिकवणी वर्ग, कार्यालये आणि मोबाईल शॉपी असल्याने परिसरात चोवीस तास वर्दळ असते. शहराच्या मध्यभागी असलेल्या या भागात अनेक रुग्णवाहिका धावत असतात. मात्र, धंतोलीत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. ही समस्या हेरून ‘सकाळ’ने ‘धंतोलीच्या हार्टमध्ये ब्लॉकेज’ नावाने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. गेल्या शनिवारपासून वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढून धंतोलीत नो-पार्किंग झोन आणि वन वे रस्ते केले. वाहतूक पोलिसांनी जनजागृती म्हणून शनिवार आणि रविवारी ५० वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी फलक लावले. मार्गदर्शन आणि जनजागृतीनंतर सोमवारपासून वाहनचालकांवर कारवाई करणे सुरू केले. आतापर्यंत १,१४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक ५१८ नो पार्किंगच्या केसेस केल्या आहेत.

धंतोलीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वन वे आणि नो पार्किंगची उपाययोजना करण्यात आली. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. नियम मोडणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू राहील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
-रवींद्रसिंग परदेशी, पोलिस उपायुक्‍त, (वाहतूक शाखा)

टॅग्स