सतीशच्या जीवनात आली ‘रोशनी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नागपूर - घरातील कमावता माणूस दहा-बारा वर्षांपासून अंथरुणाला खिळून बसला असेल, तर त्याच्या कुटुंबीयांची विशेषत: पत्नीची काय अवस्था असेल, याची कल्पनादेखील करवू  शकत नाही. मात्र, तिने नशिबाला दोष दिला नाही. अन्‌ हारदेखील मानली नाही. कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वत:वर घेत समाजापुढे अनोखा आदर्श ठेवला. 

नागपूर - घरातील कमावता माणूस दहा-बारा वर्षांपासून अंथरुणाला खिळून बसला असेल, तर त्याच्या कुटुंबीयांची विशेषत: पत्नीची काय अवस्था असेल, याची कल्पनादेखील करवू  शकत नाही. मात्र, तिने नशिबाला दोष दिला नाही. अन्‌ हारदेखील मानली नाही. कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वत:वर घेत समाजापुढे अनोखा आदर्श ठेवला. 

पतीच्या आयुष्यात ‘रोशनी’ बनून आलेली ती आधुनिक सावित्री आहे रोशनी भोवते. रोशनीचे पती सतीश भोवते हे एकेकाळी प्रसिद्ध धावपटू होते. नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या अनेक शर्यती  सतीशने त्या काळात जिंकल्या व गाजविल्या. असंख्य पदके, ट्रॉफी अन्‌ प्रशस्तिपत्रे मिळविलीत. यशाचे एकेक शिखर सर करीत असताना २००४ मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. मुंबईतील स्पर्धेच्या वेळी धावताना तो खाली पडला. सतीशच्या ‘स्पायनल कॉर्ड’ला ‘ट्युमर’ असल्याचे सांगून डॉक्‍टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. गरीब सतीशने आईचा ‘पीएफ’ व पत्नीचे दागिने विकून शहरातील एका नामवंत डॉक्‍टरकडे शस्त्रक्रिया करवून घेतली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडतच गेली आणि कंबरेपासून खालचा संपूर्ण भाग लुळा पडला. तेव्हापासून सतीश अंथरुणावरच आहे. त्या घटनेला बरोबर १२ वर्षे झालीत. सतीशला आपले आयुष्य अंधकारमय वाटू लागले. परिवारावर विनाकारण बोझ बनत असल्याने त्याच्या मनात आत्महत्येचा विचारही आला. परंतु, खंबीर रोशनीने पतीला हिंमत देत त्याच्यात जगण्याची उमेद भरली. गेल्या दहा-बारा वर्षांपासून अहोरात्र ती पतीची मनोभावे सेवा करीत आहे. शिवाय नोकरी करून कुटुंबाला आधारही देत आहे.   

रोशनी व तिचा परिवार सोमवारी क्‍वार्टरमधील दहा बाय दहा आकाराच्या झोपडीवजा घरात राहतो. घरात पतीशिवाय वृद्ध सासू आणि मुलगा व मुलगी आहेत. सासूला थोडीफार पेन्शन आणि सतीशला संजय गांधी निराधार योजनेतील सहाशे रुपये मिळतात. एवढ्याशा पैशात पतीचा उपचार, घरखर्च, मुलांचे शिक्षण करणे कठीण जाऊ लागले. त्यामुळे रोशनीने नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने माजी धावपटू मनोज बालपांडे हे देवासारखे धावून आले. मनोज यांनी त्यांच्या बेसा येथील फार्मसी कॉलेजमध्ये रोशनीला नोकरी दिली. मेहनती रोशनी दिवसभर कॉलेजमध्ये प्रामाणिकपणे नोकरी करते आणि घरी परतल्यानंतर पती व मुलांना सांभाळते. रोशनीला महिन्याकाठी मिळणाऱ्या पाच हजार रुपयांमुळे भोवते परिवाराची संसाराची गाडी आता रुळावर आली आहे. सतीशचीही प्रकृती हळूहळू सुधारत आहे.