विदर्भ अजूनही तहानलेलाच!

विदर्भ अजूनही तहानलेलाच!

नागपूर - हवामान विभागाने यंदा दमदार पावसाचा अंदाज व्यक्‍त केल्याने विदर्भातील बळीराजा आनंदात होता. मात्र, पाऊस अचानक बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांसह साऱ्यांचीच चिंता वाढली आहे. पावसाचे दोन महिने लोटूनही विदर्भातील बहुतांश जिल्हे तहानलेले असून, धरणांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पुरेसा पाऊस न झाल्यास, येत्या उन्हाळ्यात विदर्भात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण होण्याची शक्‍यता आहे.   

विदर्भात १ जून ते ३१ जुलैदरम्यान केवळ ३९९ मिलिमीटर पाऊस पडला, जो सरासरी पावसाच्या (४८० मिलिमीटर) १७ टक्‍के कमी आहे. विदर्भातील जिल्ह्यांचा विचार केल्यास अमरावती, यवतमाळ, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांची स्थिती अतिशय नाजूक आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसाच्या जवळपास २५ टक्‍के कमी पाऊस पडला. त्यामुळे धरणेही अर्धीअधिक कोरडी आहेत. नागपूर जिल्ह्यातही स्थिती फारशी चांगली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३७६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, यातील अर्धाअधिक पाऊस  (२४६ मिलिमीटर) केवळ दोनच दिवसांत बरसला. २७ जून रोजी १११ मिलिमीटर, तर १८ जुलैला १३५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.  

सर्वाधिक पावसाचा महिना म्हणून गणल्या जाणाऱ्या जुलै महिन्यात केवळ १६० मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी याच महिन्यात तब्बल चारशेच्या वर मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा पावसाने आतापर्यंत दगा दिला असला तरी, पिके समाधानकारक आहेत. पावसाळ्यातील केवळ ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोनच महिने शिल्लक आहेत. या दिवसांमध्ये चांगला पाऊस झाला नाही, तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. शिवाय उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उद्‌भवू शकते. सद्य:स्थितीत नागपूर व विदर्भातील बहुसंख्य छोटे-मोठे तलाव व धरणे कोरडे आहेत.  

जिल्ह्यातील पावसाची सरासरी
शहर        सरासरी    प्रत्यक्ष      फरक
नागपूर      ४६६     ३७६     उणे १९
अकोला    ३६९     २९३     उणे २१
अमरावती   ३९१     २९३     उणे २५
भंडारा       ५४४     ४४१     उणे २४
बुलडाणा    ३३१      ३२४   उणे २
चंद्रपूर      ५५४       ४४१    उणे २०
गडचिरोली  ६६३      ६०३    उणे ९
वर्धा        ४४३      ४३०    उणे ३
वाशीम      ४१८      ३८५    उणे ८
यवतमाळ   ४४०     ३२८     उणे २५

उकाडा वाढल्याने नागरिक हैराण
गेल्या आठ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे दिवसा व रात्रीही नागरिकांना भयंकर उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. बहुतांश शहरांतील कमाल तापमान तीन ते पाच अंशांनी वाढले. नागपूरच्या तापमानातही सरासरी चार अंशांनी वाढ होऊन अलीकडच्या काळात प्रथमच ३५ अंशांवर गेले. चंद्रपूर (३६.२ सेल्सिअस), अकोला व वर्धा (प्रत्येकी ३४ अंश सेल्सिअस) येथे पाऱ्याचा आलेख चढला. अचानक गरमी वाढल्याने अनेकांनी एसी व कूलर पुन्हा सुरू केले आहेत. अनुकूल परिस्थिती नसल्याने सध्यातरी विदर्भात जोरदार पावसाची शक्‍यता कमीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com