ड्रॅगन पॅलेस परिसरात विपश्‍यना मेडिटेशन सेंटर - ॲड. सुलेखा कुंभारे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - पवित्र दीक्षाभूमीपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरील कामठी शहरात ड्रॅगन पॅलेस परिसरात दहा कोटी रुपये खर्चून ‘विपश्‍यना मेडिटेशन सेंटर’चा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (ता. २२) आयोजित केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजून ३५ मिनिटांनी लोकार्पण होईल.

नागपूर - पवित्र दीक्षाभूमीपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरील कामठी शहरात ड्रॅगन पॅलेस परिसरात दहा कोटी रुपये खर्चून ‘विपश्‍यना मेडिटेशन सेंटर’चा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (ता. २२) आयोजित केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजून ३५ मिनिटांनी लोकार्पण होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समाजनिर्मितीसाठी कामठी शहरात बुद्ध संस्कृती रुजवण्यासाठी ओगावा सोसायटीने संकल्प केला असून, ड्रॅगन पॅलेसमध्ये या आंतरराष्ट्रीय वास्तूच्या निर्मितीनंतर दहा एकरांत विपश्‍यना मेडिटेशन सेंटर तयार करण्यात येत आहे, अशी माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिद्धार्थ गायकवाड, शील चहांदे, वंदना भगत उपस्थित होते.

थायलंडमधील रंगातून रंगले विपश्‍यना केंद्र  
नऊ कोटी ५० लाख ३३ हजार रुपये खर्चून दहा एकरांत विपश्‍यना केंद्र तयार करण्यात आले. विपश्‍यना केंद्राच्या पॅगोडावर लावण्यात आलेला सोनेरी रंग थायलंड येथून आयात केला आहे. तर अष्टधातूंची आकर्षक छत्री म्यानमार येथून आणली आहे. पॅगोडावर शिल्पकृती हैदराबाद, चेन्नई येथील ८० शिल्पकारांच्या मदतीने चार महिन्यांत तयार केली. गुजरात येथील शिल्पतज्ज्ञ ठाकूर पारेख, स्ट्रक्‍चरल डिझाइन पी. टी मसे यांनी केली आहे. एकाचवेळी १२५ साधक येथे विपश्‍यना करू शकतील. साधकांसाठी तर आचार्यांसाठी विशेष शून्यागार जागा तयार केली आहे. ११ हजार स्केअर फूटमध्ये निव्वळ बांधकाम तयार केले आहे. अप्रतिम आणि पवित्र उद्देश ठेवून विपश्‍यना केंद्र उभारले आहे.

बुद्धवंदना ग्रहण करणार राष्ट्रपती  
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी दीक्षाभूमीवर येतील. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करतील. यानंतर ११ वाजून ३५ मिनिटांनी ड्रॅगन पॅलेस परिसरात विशेष बुद्धवंदना ग्रहण करतील.