वरुणराजा रुसला बळीराजा चिंतित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागपूर - गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस दडी मारून बसल्याने बळीराजा चिंतित असून, सर्वसामान्य जनताही उकाड्याने त्रस्त आहे. सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीणच वाढणार आहे. 

नागपूर - गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस दडी मारून बसल्याने बळीराजा चिंतित असून, सर्वसामान्य जनताही उकाड्याने त्रस्त आहे. सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीणच वाढणार आहे. 

मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्राने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला होता. लगबगीने पेरण्यांना सुरुवात केली. विदर्भात आतापर्यंत २५ टक्‍क्‍यांवर पेरण्या आटोपल्या. मात्र, चार- पाच दिवसांपासून वरुणराजा रुसून बसल्याने उर्वरित पेरण्या खोळंबल्या. पावसाअभावी पिके कोमेजल्या अवस्थेत असून, या आठवड्यात पावसाच्या सरी न आल्यास दुबार पिकांची वेळ येऊ शकते. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धानाचे पीक घेण्यात येते. मात्र, दमदार पावसाअभावी धानाच्या पऱ्ह्याची स्थिती नाजूक आहे. विदर्भात सद्यःस्थितीत धुवाधार पावसाची शक्‍यता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जोरदार पावसासाठी सध्या अनुकूल स्थिती नसली तरी, ‘लोकल डेव्हलपमेंट’मुळे विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस अवश्‍य पडू शकतो. हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९८ टक्‍क्‍यांपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी आनंदात होता. मात्र, आतापर्यंत तरी त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. नागपूर जिल्ह्यात स्थिती समाधानकारक आहे. येथे आतापर्यंत २८८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.