इथे खऱ्या अर्थाने ‘जागतिक’ ठरते रंगभूमी!

इथे खऱ्या अर्थाने ‘जागतिक’ ठरते रंगभूमी!

नागपूर - आर्थिक-सामाजिक अंगाने शहरं आणि खेड्यांना एका पातळीवर आणण्याचे स्वप्न जागतिकीकरणाने दाखविले. पण, आजही ते शक्‍य झालेले नाही. सुदैवाने रंगभूमीचे ‘जागतिक’पण मात्र उमरेड येथील बाम्हणीसारख्या छोट्याशा गावातील बालकलावंतांनी सिद्ध केले आहे. शहरांतील कलावंतांच्या तुलनेत आपण कुठेही कमी नाही, हे गेली चार वर्षे सातत्याने सिद्ध करणारे हे बालरंगकर्मी खऱ्या अर्थाने जागतिक रंगभूमीदिनाचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर ठरतात.

उमरेड तालुक्‍यातील एक छोटेशे गाव. लोकसंख्या फारतर नऊशे-हजार. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांचीच संख्या जास्त असावी. उन्हातान्हांत काबाडकष्ट करून रात्री समाधानाची झोप घेणारे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा संघर्षासाठी सज्ज होणारे हे गाव. गावातली लेकरं शहरातले चित्र फक्त टीव्हीवरच बघत असतात आणि आता फार तर मोबाईलवर. पण, गावातील कष्टकरी कुटुंबांमधून निवडक कलंदर आणि थोडे बिलंदर कलावंत निवडण्याचे काम संजय गायकवाड नावाचा नाटकासाठी ‘वेडा’ झालेला तरुण करतो. ‘नाटक कायले कराचं गा?’ असा सवाल करणारी छोटी छोटी मुलं ‘काऊन गा, नाटक नाई कराचं का?’ येथपर्यंत मजल मारून गेली आणि ते संजयला लक्षातसुद्धा आलं नाही. राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत ही मुलं चार वर्षांपूर्वी धडकली तेव्हा ते असे काही भूमिकेत शिरले, की नाटकातही खरे अश्रू डोळ्यात तरळत होते. 

तीनवेळा अंतिमला धडक देऊन विदर्भातील रंगभूमीला ‘कोण आहेत हे कलावंत?’ असा प्रश्‍न पडू लागला. भाकरीचे वास्तव असो वा फुटपाथवरचे, या लेकरांनी विदर्भ तर वारंवार जिंकला. पण, यंदा अंतिममध्येही पदकांवर नावं कोरली. यंदा या मेहनतीला ‘अशा एका शनिवारी’ या नाटकाच्या निमित्ताने राज्यस्तरावर ओळख मिळाली. राज्यभरातील पन्नास-साठ नाटकांमध्ये बाम्हणी गावातील या  मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला. जीव ओतून काम करणाऱ्या या बालकलावंतांनी संजयने अतिशय ताकदीने घडविले आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये संजय यातील काही मुलांना वावरातून तालमीसाठी पकडून आणायचा. आज ही मुलं रंगभूमीमय झाली आहेत. नाटक त्यांचा श्‍वास  झाला आहे. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या, जेमतेम अर्थव्यवस्थेत गाडा खेचणाऱ्या एका  छोट्याशा गावाला अभिनयाच्या जोरावर ओळख मिळवून देणारे बालरंगकर्मी खरेच कौतुकास पात्र ठरतात.

माझ्या या लेकरांनी मला जगणे शिकवले. माझ्या अनेक पैलूंमध्ये ते सामावले आहेत. लालबहादूर विद्यालयातील या विद्यार्थ्यांनी मला कधीही कसलीच उणीव भासू दिली नाही. कधी मी त्यांचा बाप होतो, कधी आई, कधी बहीण, कधी भाऊ तर कधी शिक्षक. त्यांच्यामुळे सर्व भूमिका आनंदाने जगतो.
- संजय गायकवाड,  दिग्दर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com