ग्रामीण भागातील रस्त्यांची पाचशे कामे रखडली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जून 2016

नागपूर :  पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडुजी आणि इतर कामे करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. परिणामी पाचशेहून अधिक रस्त्यांची कामे रखडली असून, भरपावसाळ्यात गावकऱ्यांना चिखलातून पायपीट करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
 

नागपूर :  पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडुजी आणि इतर कामे करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. परिणामी पाचशेहून अधिक रस्त्यांची कामे रखडली असून, भरपावसाळ्यात गावकऱ्यांना चिखलातून पायपीट करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
 

नागपूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील नवीन रस्त्यांची कामे तसेच जुन्या रस्त्यांच्या डागडुजीकरिता 50 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे वर्षभरापूर्वीच केली. पावसाळ्यापूर्वी ही कामे न केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होतील. बऱ्याच भागातील वाहतुकीवरसुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता असल्याची बाबसुद्धा ग्रामीण विकास विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. पावसाळ्याला सुरुवात झाली असून शेतकरी खते, बियाणे तसेच इतर साहित्यांची खरेदी शहरातील बाजारपेठेतून करून गावाकडे नेतात. परंतु, रस्त्यांची स्थिती बिकट असल्याने त्यांना आत्ताच तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांनी बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. या विभागानेसुद्धा याची गांभीर्यता ओळखून दुरुस्तींच्या कामाकरिता 50 कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्याला आता वर्षभराचा कालावधी लोटला असून अद्याप जिल्हा परिषदेला तो निधी मिळालेला नाही. पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि लहान पुलांची डागडुजी करायची होती. मात्र, निधीअभावी सर्व कामे रखडल्याने कामे कशी करावी, असा प्रश्‍न बांधकाम विभागाला पडला आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार, काही ठिकाणी जडवाहतुकीला निर्बंध आहेत. तरीही, जडवाहतूक सर्रासपणे ग्रामीण भागात सुरू आहे. येथील रस्त्यांची दुर्दशेस पोलिस आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.
 

चिखलातून काढावा लागणार मार्ग 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत आठ उपविभागीय कार्यालये येतात. प्रत्येक विभागात पावसाळ्यापूर्वी 50 ते 60 कामे रखडली आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे. पावसाळ्यात कोणतीही कामे करता येणार नाहीत. गेल्या वर्षीचे रपटे आणि रस्त्यांच्या डागडुजीचे कामे झालेली नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागणार आहे.

फोटो गॅलरी