'उपर से टापटीप अंदर से राम जाने'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नागपूर स्थानकाला अस्वच्छतेचा विळखा - वर्धा, बल्लारशाची मुसंडी
नागपूर - रेल्वे मंत्रालयामार्फत त्रयस्त संस्थेतर्फे करण्यात आलेल्या स्वच्छता ऑडिटमध्ये नागपूर रेल्वेस्थानक 237 व्या स्थानावर राहिले.

नागपूर स्थानकाला अस्वच्छतेचा विळखा - वर्धा, बल्लारशाची मुसंडी
नागपूर - रेल्वे मंत्रालयामार्फत त्रयस्त संस्थेतर्फे करण्यात आलेल्या स्वच्छता ऑडिटमध्ये नागपूर रेल्वेस्थानक 237 व्या स्थानावर राहिले.

प्रवेशद्वार चकचकीत आणि परिसरातील अस्वच्छता पाहता "उपर से टापटीप अंदर से राम जाने' म्हणण्याची वेळ आली आहे. त्या तुलनेत वर्धा, चंद्रपूर, बल्लारशा स्थानकाने मात्र चांगलीच मुसंडी मारली आहे.
स्वच्छता ऑडिटचा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

देशभरातील "ए वन आणि ए' दर्जाच्या एकूण 407 रेल्वेस्थानकामधून गत वर्षी नागपूर 310 व्या स्थानी होते. वर्षभरात वारेमाप प्रयत्न करूनही नागपूरला 237 व्या स्थानापर्यंतच मजल मारता आली. बल्लारशाने मात्र 251 व्या स्थानावरून 33 व्या क्रमांकावर, चंद्रपूरने 260 वरून 38 व्या क्रमांकावर तर वर्धा स्थानकाने 215 वरून 39 व्या स्थानावर मजल मारली. मध्य रेल्वे झोनचा विचार केल्यास बल्लारशा 5 व्या, चंद्रपूर 6 व्या तर वर्धा स्टेशन 7 व्या स्थानावर राहिले. नागपूर स्थानकाला 25 व्या स्थानावरच समाधान मानावे लागले.

अफाट पसारा असलेल्या नागपूर स्थानकाच्या स्वच्छतेत प्रशासनाला अपेक्षित सुधारणा करता आल्या नाही. स्वच्छतेचा बोभाटा करण्यात आला असला तरी संपूर्ण यंत्रणा दर्शनी भाग आणि फलाट एकवरच एकवटलेली दिसली. यात अन्य भागाकडे दुर्लक्ष झाले. फलाट क्रमांक 1 लगत नॅरोगेशच्या जागेवर अनेक महिन्यांपासून पाणी साचून गलीच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येतात. त्याचाच फटका क्रमवारीत बसल्याचे जाणवते.

तीन स्तरावर तपासणी
त्रयस्त संस्थेने प्रक्रिया, प्रत्यक्ष निरीक्षण आणि जनमत या आधारावर रेल्वेस्थानकांना गुणांकन दिले. नागपूर स्थानकाला जनमतात तब्बल 557 गुण मिळाले. पण, प्रक्रियेत 184 आणि प्रत्यक्ष निरीक्षणात 186 असे 1 हजारापैकी 927 गुण मिळाले.

प्रवाशांकडून पसंतीची पावती
रेल्वेस्थानक भावले - 72 टक्के
डस्टबिन व्यवस्थेवर समाधान - 86 टक्के
प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता - 70 टक्के
नळ स्टॅंड परिसर स्वच्छ - 95 टक्के
पाण्याचा व्यवस्थित निचरा - 85 टक्के
वेटिंग रूम चांगले - 82 टक्के
अस्वच्छतेसाठी दंड होत असल्याची माहिती - 80 टक्के
उंदीर, झुरळ आढळले नाही - 73 टक्के
दुर्गंधी नाही - 73 टक्के