प्रतिक्षा संपली, स्वप्न प्रत्यक्षात उतरणार 

प्रतिक्षा संपली, स्वप्न प्रत्यक्षात उतरणार 

नागपूर - नागपुरात सिंथेटिक ट्रॅक होणार, असे ऐकत क्रीडाक्षेत्रातील दोन पिढ्यांची कारकीर्द संपुष्टात आली. अखेर नागपुरातील ऍथलेटिक्‍स क्षेत्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, ती घडी आता जवळ येऊन ठेपली आहे. ऍथलिट्‌समधील कामगिरी उंचावण्यासाठी अत्यावश्‍यक असलेला सिंथेटिक ट्रॅक अंतिम टप्यात आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुल परिसरात असलेल्या ट्रॅकचे बांधकाम पुढील दीड महिन्यात पूर्ण होण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात आली आहे, त्यामुळे नवीन मोसमापासून धावपटूंना सरावासाठी त्यांच्या हक्‍काची जागा मिळणार आहे. 

मध्यम व लांब पल्ल्यांच्या धावपटूंचे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. उल्लेखनीय म्हणजे, या सर्व धावपटूंनी विपरीत परिस्थितीत खडबडीत ट्रॅकवर सराव करून हे यश मिळविले. कामगिरी उंचावायची असेल, तर नागपुरातही सिंथेटिक ट्रॅक व्हावा, ही कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. मात्र, वर्षामागून वर्षे उलटूनही त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मात्र, आता लवकरच त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मानकापुरात साकारत असलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, येत्या 15 एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती, प्रभारी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांनी "सकाळ'ला दिली. 

असा आहे सिंथेटिक ट्रॅक 
खर्च - साडेबारा कोटी रुपये 
कंपनी - सुपर कन्स्ट्रक्‍शन, नागपूर 
एकूण जागा - 8,500 चौरस मीटर 
चारशे मीटरमध्ये एकूण नऊ तर शंभर मीटरसाठी दहा लेन राहतील. 

सध्या रबरचा समावेश असलेले डांबर टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यानंतर अंतिम लेअर (सील कोट) टाकून फायनल मार्किंग केले जाईल. हे सर्व काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती, प्रकल्प अभियंता तुषार सरकार यांनी दिली. सिंथेटिक ट्रॅकसाठी लागणारे सर्व साहित्य जर्मनीहून आयात करण्यात आले आहे. 

ट्रॅक परिसरात या सोयी राहणार 
ट्रॅकच्या मधोमध लॉनयुक्‍त फुटबॉल मैदान राहणार आहे. लॉनसाठी पाचगाव (उमरेड रोड) येथून आणण्यात आलेल्या बर्मूडा ग्रासचा उपयोग करण्यात आला आहे. दुसऱ्या चरणात 40 हजार प्रेक्षक क्षमता असलेले पॅव्हेलियन व चारही बाजूने गॅलरी बांधण्यात येणार आहे. शिवाय फ्लडलाइटचीही सुविधा राहणार आहे. ट्रॅक व इतर सोयींवर एकूण 25 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. 

मलेशियाचे अभियंते नागपुरात 
सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम उत्तम दर्जाचे व्हावे, यासाठी दोन अभियंते मलेशियाहून नागपुरात आले आहेत. जेम्स आणि ली नावाचे हे तज्ज्ञ स्वत: मेहनत घेत आहेत. ट्रॅक पूर्ण होईपर्यंत त्यांचा मुक्‍काम नागपुरात राहणार आहे. 

राज्यातील पाचवे शहर 
सिंथेटिक ट्रॅक असलेले नागपूर हे महाराष्ट्रातील पाचवे शहर राहणार आहे. यापूर्वी पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर येथे सिंथेटिक ट्रॅक बांधण्यात आले आहे. पुण्यात बालेवाडी व पुणे महानगरपालिकेच्या सनस मैदानावरील ट्रॅक असे दोन आहेत. मुंबईत नेपियन्स रोड, कांदिवली येथील क्रीडा प्राधिकरण आणि मरिन लाइन्स येथे मुंबई विद्यापीठाचा असे तीन ट्रॅक आहेत. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाने ट्रॅक उभारला आहे. नाशिक येथे विभागीय संकुलात ट्रॅक बांधण्यात आला आहे. 

स्पर्धेने होणार उद्‌घाटन 
सिंथेटिक ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर एखादी स्पर्धा आयोजित करून ट्रॅकचे धडाक्‍यात उद्‌घाटन करण्याचा मनोदय रेवतकर यांनी व्यक्‍त केला. महाराष्ट्राला यंदा ज्युनिअर गटाच्या पश्‍चिम विभागीय स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, ही स्पर्धा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात नागपुरात होण्याची दाट शक्‍यता आहे. या स्पर्धेने ट्रॅकचे उद्‌घाटन होऊ शकते. 

"मेंटेनन्स'साठी विशेष सोय 
सिंथेटिक ट्रॅकची देखभाल अर्थात मेंटेनन्स अत्यंत जिकिरीचे काम असते. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याचीही विशेष काळजी घेतली आहे. इनडोअर हॉल, बॅडमिंटनपटूंकडून मिळणारे शुल्क, भाड्याने दिलेले क्रिकेट मैदान तसेच वर्षभर संकुल परिसरात होणारे विविध सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या निधीतून ट्रॅकचे "मेंटेनन्स' केले जाणार आहे. सद्यस्थितीत मेंटेनन्ससाठी प्रशासनाकडे सव्वा कोटी रुपये असून, ही रक्‍कम यासाठी वापरण्यात येणार आहे. 

"इन्फ्राटेक'ची झाली होती हकालपट्टी 
खरं तर सिंथेटिक ट्रॅकच्या कामाला 2011 मध्येच सुरवात झाली होती. बांधकामाचे कंत्राट 17.53 कोटी रुपयांमध्ये दिल्ली येथील प्रसिद्ध स्पोर्टस इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीला देण्यात आले होते. मात्र, कंपनीने विविध कारणे देऊन बांधकाम रखडत ठेवल्याने संकुल बांधकाम समितीने त्यांची 2013 मध्ये हकालपट्टी केली. त्यानंतर रेती टाकण्याचे काम नागपूरच्या मुसळे कंस्ट्रक्‍शन कंपनीला देण्यात आले. तेव्हापासून ट्रॅकचे बांधकाम थंडबस्त्यात होते. 

""मला खेळाडूंच्या भावनांची जाणीव आहे. त्यामुळे माझ्या कारकिर्दीत ट्रॅक पूर्ण व्हावा, अशी मनापासून इच्छा होती. त्यामुळेच जिद्दीने कामाला लागलो होतो. अपेक्षेप्रमाणे ट्रॅकला थोडा उशीर झाला. पण, आनंदी व समाधानी आहे. हा ट्रॅक नागपूरच्या क्रीडा इतिहासात निश्‍चितच मैलाचा दगड ठरणार आहे. यानंतर लवकरच ऍस्ट्रोटर्फ मैदानासाठीही प्रयत्न करणार आहे.'' 
-सुभाष रेवतकर (प्रभारी उपसंचालक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com