शासकीय कार्यालयांतील दलालांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

६३ दलाल ताब्यात - १० पथकांनी केली फिल्मीस्टाइल कारवाई

६३ दलाल ताब्यात - १० पथकांनी केली फिल्मीस्टाइल कारवाई
नागपूर - शहरातील शासकीय कार्यालयांत दलालांचा सुळसुळाट वाढत असल्यामुळे बोगस कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याच्या तक्रारींचा ओघ गुन्हे शाखेकडे होता. त्यामुळे गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत शहरातील मोठमोठ्या दहा शासकीय कार्यालयांत छापे घातले. या कारवाईत एका महिलेसह ६३ दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून बनावट शासकीय शिक्‍के, स्टॅम्प, अन्य अर्ज आणि कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांनी गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत केली.  

गेल्या काही दिवसांपासून आरटीओ कार्यालय, मनपा, तहसील कार्यालय, सब रजिस्ट्रार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दलालांचे वर्चस्व होते. त्यामुळे शेकडो बनावट कागदपत्रे तयार करण्यात येत होती. या संदर्भात सदर पोलिस ठाण्यात आणि तहसील पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या. तसेच निनावी अर्जाद्वारे गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यावरून बुधवारी ‘सिक्रेट प्लॅन’ आखण्यात आला. गुरुवारी सकाळी दहा वाजता गुन्हे शाखेची दहा पथके तयार करण्यात आली. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांसह ११० पोलिस आणि २० पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता.

अकरा वाजता गुन्हे शाखेची दहा पथके वेगवेगळ्या वाहनांनी शासकीय कार्यालयांत पोहोचली. शासकीय कार्यालयाच्या परिसरात बस्तान मांडून बसलेल्या दलालांची धरपकड सुरू केली. बोगस डॉक्‍युमेंट्‌स, शिक्‍के आणि अन्य साहित्य आढळलेल्या ६३ दलालांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. त्यांना गुन्हे शाखेत आणण्यात आले. त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. शेवटी अनेक बोगस कागदपत्रे आढळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई एसीपी वाघचौरे, प्रदीप अतुलकर, जितेंद्र बोबडे, सचिन लुले, गोरख कुंभार, विक्रांत सगणे, ज्ञानेश्‍वर भेदोडकर यांनी केली.

आरटीओ कार्यालयात पोलिस स्टेशनचे काम! 
कामठी मार्गावरील लाल गोदामाजवळील आरटीओ कार्यालयातून कळमेश्‍वर पोलिस ठाण्याचे काम सुरू असल्याचे उघडकीस आले. आरटीओ कार्यालयातून कपिल अनिल टेंभूरकर (वय ३२, चॉक्‍स कॉलनी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे कळमेश्‍वर पोलिस ठाण्याचे शिक्‍के, ड्यूटी ऑफिसरचे शिक्‍के आढळून आले. कुणालाही वाहनचोरीची तक्रार कपिल हातोहात बनवून द्यायचा. तसेच पोलिस ठाण्यातील तक्रारीही तो आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच स्वीकारत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हे शाखेने दहा शासकीय कार्यालयांत छापे घातल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे अन्य शासकीय कार्यालयांतील दलालांमध्ये खळबळ उडाली. अनेक दलालांनी पळ काढला तर काहींनी बनावट शिक्‍के आणि स्टॅम्प कार्यालय परिसरातच लपवून ठेवले. 

जुन्या स्टॅम्पपेपरची विक्री 
बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी बॅक डेटेड स्टॅम्पपेपर विकणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जुने स्टॅम्प पेपर पोलिसांनी जप्त केले. गीता प्रमेश्‍वर श्रीपाद (वय ३८, देशपांडे ले-आउट), प्रवीण रामकृष्ण आष्टनकर (४१, रघुजीनगर) आणि नीलेश अरुण सेलोकर या तिघांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडे २०१५, २०१६ सालचे स्टॅम्पपेपर आढळून आले.

सर्वांधिक दलाल आरटीओत
गुन्हे शाखेने एकूण ६३ दलालांना अटक केली. यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, एनआयटी, प्रशासकीय इमारत क्र.१, उपनिबंधक कार्यालयातील दलालांवर छापेमारी केली. यामध्ये आरटीओ कार्यालयात सर्वांधिक ४० दलालांना ताब्यात घेण्यात आले. तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा कार्यालयात प्रत्येकी तीन दलालांना ताब्यात घेण्यात आले.

दहा हजारांत जिवंत व्यक्‍तीचा मृत्यू दाखला
मनपाच्या एका कार्यालयासमोर बसलेल्या दलालाकडे साध्या वेशात पोलिस महिला गेली. तिने जिवंत व्यक्‍तीचा मृत्यूचा दाखला बनवून देण्याची मागणी केली. दलालाने दहा हजार रुपयांत दाखला देण्याचा सौदा केला. ‘सायंकाळी मृत्यूचा दाखल मिळून जाईल, पैसे तयार ठेवा’ अशी सूचना देऊन तो दलाल मनपा कार्यालयात लगबगीने निघून गेला. यावरून मनपा कार्यालयात बनावट दस्तऐवज बनवून देणारे रॅकेट असून त्यामध्ये मनपा कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे.

१० मिनिटांत जातप्रमाणपत्र!
जिल्हाधिकारी कार्यालयात एका महिला पोलिसाने दलालाला पैसे खर्च करण्याची तयारी दर्शवून लगेच जात प्रमाणपत्राची मागणी केली. दलालाने सरळ ५ हजार रुपयांची मागणी करीत केवळ १० ते १५ मिनिटांत जातप्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शविली. तर चार हजार रुपये दिल्यास दोन तासांत प्रमाणपत्र देण्याची सौदा एका दलालाने केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.