१७२ अविवाहितांचा गर्भपात

१७२ अविवाहितांचा गर्भपात

समाजरचनेला धक्का  - १५-१९ वयोगटातील तरुणींची संख्या चिंताजनक

नागपूर - आधुनिक युगात महिला पुरुषांच्या बरोबरीने कर्तबगारी दाखवून सन्मान मिळवत असतानाच भावनेच्या आहारी जाऊन शारीरिक संबंधाला बळी पडणाऱ्या तरुणींच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र गर्भपाताच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मागील वर्षात १५-१९ वयोगटातील १७२ तरुणींनी गर्भपात केल्याचे एमटीपीच्या आकडेवारीतून दिसून आले. मात्र, ही अधिकृत नोंदणीची आकडेवारी असून, अवैध गर्भपाताची संख्या यापेक्षा मोठी असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली असून, समाजरचनेलाही यामुळे धक्का बसला आहे. 

सुरक्षित गर्भधारणा हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १९७१ मध्ये गर्भपाताबाबत कायदा मंजूर केला. या कायद्याअंतर्गत शहरात २२० गर्भपात केंद्र असून, २०१६-१७ या वर्षात विविध वयोगटांतील वेगवेगळ्या कारणांसाठी १३ हजार ८१३ महिलांनी गर्भपात केल्याचे एमटीपीच्या आकडेवारीत स्पष्ट आहे. मात्र, यात १५ ते १९ वयोगटातील गर्भपात करणाऱ्या तरुणींच्या संख्या पालकांच्या डोळ्यात अंजण घालणारी आहे. गर्भधारणेच्या १२ आठवड्यांच्या आत कुठलेही कारण न देता गर्भपात करता येते. त्यामुळे गर्भधारणेच्या १२ आठवड्यांच्या आत गर्भपात करणाऱ्यांची संख्या १२ हजार ९९३ आहे. मागील वर्षात १५-१९ वयोगटातील १७४ तरुणींनी गर्भपात केला.

शहरातील अधिकृत गर्भपात केंद्रात झालेल्या गर्भपाताची ही आकडेवारी आहे. अनधिकृत गर्भपात केंद्रात होणाऱ्या किंवा घरगुती उपायातूनही गर्भपात केले जाते. त्यामुळे ही आकडेवारी यापेक्षाही मोठी असण्याची शक्‍यता नाकारता येत आहे. लैंगिक छळ, प्रेमप्रकरणातून तरुणींच्या गर्भपाताचे प्रमाण वाढत आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. मुंबईत ही आकडेवारी दुप्पट असून, तेथील बिनधास्त जीवनशैली उपराजधानीवरही गारुड करीत असल्याचे शहरातील विविध उद्याने, पिकनिक स्पॉटवरील दृश्‍यातून दिसून येत आहे. 

अत्याचारामुळेही वाढ 
लैंगिक अत्याचारामुळे गर्भधारणा झाल्याने गर्भपात करण्याचीही वेळ तरुणीवर आल्याचे धक्कादायक वास्तव या आकडेवारीतून पुढे आले आहे. मागील वर्षी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या १० तरुणींनी गर्भपात केल्याचे दिसून येत आहे.

पंधरावं वरीस धोक्‍याचं
२०१६-१७ या वर्षात पंधरा वर्षांखालील मुलींच्या गर्भपाताची नोंद नाही, ही समाधानकारक बाब असली तरी २०१५-१६ या वर्षात १५ वर्षांखालील १५ मुलींनी गर्भपात केला होता. कोवळ्या वयातच या मुलींवर गर्भपाताची वेळ आल्याने चिंता कायम आहे. 

कुठलेही कारण न देता गर्भपात 
अपंग बाळ होऊ नये, मातेच्या आरोग्याला धोका असल्यामुळे गर्भपात करण्यास कायद्यानेही मंजुरी दिली आहे. मात्र, मागील वर्षी कुठलेही कारण न देता ५२० जणींनी गर्भपात केला. आरोग्याला धोका असल्यामुळे ५०० महिलांनी गर्भपात केला. 

तीन महिन्यांत २,३६६ गर्भपात
गेल्या तीन महिन्यांत एप्रिल ते जूनपर्यंत शहरातील २२० गर्भपात केंद्रांमध्ये २,४६६ गर्भपाताची नोंदणी करण्यात आली. यात तीन महिन्यांची गर्भधारणा असलेल्या २,३६६ महिला असून तीन महिन्यांपेक्षा जास्त गर्भधारणा असलेल्या १९९ महिला आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com