कत्तलीसाठी नेणारी १७५ जनावरे पकडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे नेली जात असल्याच्या माहितीवरून सदर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमुळे गड्डीगोदाम परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांचा रोष लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी सात घरांमधून १७५ जनावरे आणि ४५० कातडे जप्त केले.

गोवंध हत्येवर प्रतिबंध असतानाही गड्डीगोदाम परिसरात जनावरांची नियमित कत्तल केली जात असून शनिवारीही मोठ्या प्रमाणावर जनावरे कत्तलीसाठी आणण्यात आली असल्याची माहिती सदर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सदर पोलिसांचा ताफा कारवाईसाठी गड्डीगोदाम परिसरात दाखल झाला. पोलिसांनी घरात शिरून जनावरांचा शोध घेण्यास प्रारंभ करताच स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याच प्रयत्नही केला. 

मात्र, कुणीच एैकून घेत नव्हते. काहींनी कारवाईवर रोष व्यक्त करीत स्थानिकांना चिथावणी दिली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. 
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्‍यता आसल्याने अतिरिक्त मदत मागवून घेण्यात आली. पोलिस उपायुक्त राकेश ओला, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र बोरावके, ज्ञानेश देवळे, पोलिस निरीक्षक सुनील बोंडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीची पाहणी केली.  चोख पोलिस बंदोबस्तात घरांमध्ये झाडाझडती घेण्यात आली. यात सात घरांमधून १७५ जनावरे आणि सुमारे ४५० कातडे आढळले. पोलिसांनी कातडे जप्त करीत जनावरांची गोरक्षणमध्ये रवानगी केली. परिसरात दिवसभर तणावाची स्थिती असल्याने पोलिस अधिकारीही तळ ठोकून होते. पोलिस कारवाईला विरोध दर्शवून तणाव निर्माण करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या भागात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात होता.