विशेष फेरीत दोन हजारांवर प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

अकरावी प्रवेश - आजपासून ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’नुसार प्रवेश देणार
नागपूर - केंद्रीय प्रवेश समितीद्वारे अकरावीसाठी राबविलेल्या ऑनलाइन प्रक्रियेत घेतलेल्या विशेष फेरीनुसार शनिवारपर्यंत २ हजार ५८ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. त्यामुळे आता ऑनलाइन प्रक्रियेत एकूण ३३ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. विभागाकडून रिक्त जागांसाठी रविवारपासून (ता. २०) ३० ऑगस्टपर्यंत ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’नुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेश - आजपासून ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’नुसार प्रवेश देणार
नागपूर - केंद्रीय प्रवेश समितीद्वारे अकरावीसाठी राबविलेल्या ऑनलाइन प्रक्रियेत घेतलेल्या विशेष फेरीनुसार शनिवारपर्यंत २ हजार ५८ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. त्यामुळे आता ऑनलाइन प्रक्रियेत एकूण ३३ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. विभागाकडून रिक्त जागांसाठी रविवारपासून (ता. २०) ३० ऑगस्टपर्यंत ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’नुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

राज्यातील पाच शहरांमध्ये या वर्षीपासून अकरावी प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार शहरातील १७० कनिष्ठ महाविद्यालयांतील ५२ हजारांवर जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी सुमारे ३५ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे १७ हजारांवर जागा तशाच रिक्त राहणार असल्याचे चित्र होते. चार फेऱ्यांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया घेतली. 

यामध्ये विज्ञान शाखेत १४ हजार २९५, वाणिज्य शाखेत ७ हजार ७८३, कला शाखेत २ हजार ३७६, तर एमसीव्हीसीमध्ये १ हजार ४३८ असे एकूण २५ हजार ८९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. याशिवाय व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातून ५ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दोन्हींची बेरीज केल्यास एकूण ३१ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. 

यानंतर विशेष फेरी घेतली. त्यात १ हजार ५९५ आणि पहिले ऑप्शन न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी २ हजार ५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे व्यवस्थापन कोट्यातून ५ हजार ७८६, तर पाच फेरीतील २७ हजार ८६० अशा एकूण ३३ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 

मात्र, अद्याप  दीड हजारावर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

अशी आहे प्रक्रिया
२० ऑगस्ट - सायंकाळी गट १ मधील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा संकेतस्थळावर जाहीर करणे.
२१ ऑगस्ट - ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्‍चित करणे. (१० ते ५)
२१ ते २२ ऑगस्ट - महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे. (१० ते ५). सायंकाळी गट २ साठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करणे.
२३ ऑगस्ट - महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे. (१० ते ५)
२३ ते २४ ऑगस्ट - महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे. सायंकाळी गट ३ साठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करणे.
२६ ते २८ ऑगस्ट - प्रवेश निश्‍चित करणे. (दहा ते पाच)
२८ ते २९ - महाविद्यालयात प्रवेश घेणे. (दहा ते पाच)
३० ऑगस्ट - सर्व रिक्त जागांचा तपशील ऑनलाइन घोषित केला जाईल. (सायंकाळी पाच वाजता)

फेरीत यांचा समावेश 
अद्याप प्रवेश न झालेले. 
सर्व फेऱ्यांमध्ये महाविद्यालय न मिळालेले विद्यार्थी
प्रवेश रद्द केलेले व प्रवेश नाकारलेले विद्यार्थी.
उर्वरित विद्यार्थ्यांचे तीन गटांत विभाजन
गट १ - ८० ते १०० टक्के (४०० ते ५००) गुण मिळविणारे विद्यार्थी 
गट २ - ६० ते १०० टक्के (३०० ते ५००) गुण मिळविणारे विद्यार्थी 
गट ३ - दहावीत उत्तीर्ण झालेले सर्वच विद्यार्थी (१७५ ते ५००) गुण मिळविणारे.