दोन हजार कोटींचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

जीएसटीचा फटका - ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, कामगार आर्थिक अडचणीत

नागपूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला थोडी गती मिळाली असताना आता पुन्हा वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फटका या व्यवसायाला बसला आहे. गेल्या एका महिन्यांत दोन हजार कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जीएसटीचा फटका - ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, कामगार आर्थिक अडचणीत

नागपूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला थोडी गती मिळाली असताना आता पुन्हा वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फटका या व्यवसायाला बसला आहे. गेल्या एका महिन्यांत दोन हजार कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

विदर्भासह मध्य भारतातील नागपूर ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. एक जुलैपासून देशभरात वस्तू  व सेवाकर लागू करण्यात आला. त्यात प्रथमच कापडावर जीएसटी लावण्यात आला. याशिवाय लोखंड, ब्रॅण्डेड धान्यासह इतरही वस्तूंवर कराच्या टक्केवारीत वाढ केली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोणताही नवीन माल खरेदी केला नाही. व्यापाऱ्यांमध्ये अद्यापही या कराबद्दल संभ्रमाची स्थिती असल्याने बाजारात अद्याप ग्राहकांची वर्दळ मंदावली आहे. त्यामुळे बाजारात मालाची टंचाई जाणवू लागली असून त्याचा सर्वाधिक फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना बसला आहे. नागपुरातून मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मोठा व्यवसाय होतो. मात्र, व्यापारीच माल खरेदी करीत नसल्याने ट्रक व्यवसाय थंडावला आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत दोन हजार कोटींच्या व्यवसायाला ब्रेक लागला आहे. परिणामी, ट्रान्सपोर्ट व्यवसायातील कामगार, चालक आणि वाहकांच्या हात रिकामे आहेत. ट्रान्सपोर्ट व्यवसाय ७० टक्के प्रभावित झाल्याने शहरातील कळमना, भंडारा, अमरावती रोड, वर्धा रोड, कोराडी रोडवर ट्रकच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. ट्रक संचालकांनी वाहनाच्या कर्जाचे हप्तेही रखडण्याची शक्‍यता बळावली आहे. 

कंपन्यांनी जीएसटीमुळे गेल्या काही महिन्यापासूनच उत्पादनात घट केली होती. जुन्या मालाची विक्री करून नवा माल नव्या दराने विक्री करण्यासाठी सर्व प्रतीक्षेत आहेत. डिस्ट्रीब्युटर बाजारात माल पाठवित असला तरी छोट्या व्यापाऱ्यांनी अद्याप जीएसटीचा नंबर घेतलेला नाही. त्यांनी नवा मालच खरेदी करणे बंद केले आहे. कंपन्यांमधून निघालेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान २० दिवस लागतात. जीएसटीमुळे ही साखळी पूर्णपणे विस्कळीत झालेली असून बाजार पूर्वस्थितीत येण्यासाठी किमान पुढला महिना उघडावा लागणार आहे, असे विदर्भ ट्रक ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपसिंह तुली म्हणाले.  

साखळीनंतरच व्यवसायाला गती
कंपनीसोबत ‘कंसायमेन्ट एजन्सी’जवळ जीएसटी असणे अनिवार्य आहे. विनाजीएसटी मालाची वाहतूक करता येणार नसल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसाय प्रभावित झाला आहे. ही यंत्रणा एका साखळीप्रमाणे काम करते ही साखळी तयार झाल्यानंतरच व्यवसायाला गती मिळणार आहे. गेल्या महिन्याभरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा दोन हजार कोटींचा व्यवसाय ठप्प झाला आहे, असे कुक्कू मारवाह यांनी सांगितले.