चाळीस अभियांत्रिकी महाविद्यालये होणार बंद!

मंगेश गोमासे
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त 

नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास ४०  महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला आहे. यात नागपूर विभागातील नऊ महाविद्यालयांचा समावेश आहे. 

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त 

नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास ४०  महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला आहे. यात नागपूर विभागातील नऊ महाविद्यालयांचा समावेश आहे. 

राज्यभरात उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेनंतर राज्यातील ३६० अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ७३ हजार ८४३ जागा यावर्षी रिक्त आहेत. बारावीच्या निकालानंतर एक जूनला एमएचसीईटीचा निकालाची घोषणा होताच, दुसऱ्या दिवसापासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीस सुरुवात करण्यात आली. राज्यातील एक लाख ४४ हजार ८८१ जांगासाठी जवळपास सव्वादोन लाखावर अर्ज आले होते. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा तसा कमी राहील, अशी आशा महाविद्यालयांना होती. प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना २२ जुलैला एक संधी दिली. सीईटी उत्तीर्ण झालेल्यांना ऑप्शन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्याकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. परिणामी तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील १३ हजार २१८ अल्पसंख्याक, तर एक लाख १३ हजार ३४६ सामान्य, अशा एकूण एक लाख २६ हजार  ५०० विद्यार्थ्यांना ‘कॅप राउंड’च्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार होते. यामध्ये केवळ ७ हजार ५५८ अल्पसंख्याक, तर ५८ हजार ४८० सामान्य विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले. 

याशिवाय संपूर्ण शिक्षण शुल्क असलेल्या ६ हजार ६५५ जागांपैकी ४ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविले. त्यामुळे राज्यात रिक्त जागांचा आकडा जवळपास ७३ हजारांवर पोहोचला. आता अंतिम प्रवेशाची तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, राज्यातील  चाळीस महाविद्यालयांमध्ये ३० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रवेश न झाल्याची माहिती समोर आहे.

एआयसीटीईने घेतलेल्या निर्णयानुसार विविध राज्यांच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची यादी मागविण्यात येईल. यानंतर महाविद्यालय बंद करण्याचे आदेश दिले जातील. यापूर्वीच एआयसीटीईने विद्यार्थी मिळत नसलेल्या महाविद्यालयांना अभ्यासक्रम बंद करण्याचे निर्देश दिले होते.
- डॉ. अनिल सहस्रबुद्धे अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद