विदर्भातील ६० हजार व्यक्तींची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नागपूर - शरीरातील पोटॅशियमचा ऱ्हास झाल्याने हातपाय लुळे पडण्यापासून तर भूक मंदावणे, अकारण उलटी, हातापायांसह चेहऱ्यावर सूज येण्यापासून तर थकवा या लक्षणांसहित मधुमेह, रक्तदाब, मुतखडा, जंतूसंसर्ग ही किडनी विकाराची लक्षणे आहेत. किडनी निकामी झाल्यामुळे महाराष्ट्रात चार हजार व्यक्ती किडनीच्या प्रतीक्षेत डायलिसिसवर आयुष्य जगत आहेत. 

नागपूर - शरीरातील पोटॅशियमचा ऱ्हास झाल्याने हातपाय लुळे पडण्यापासून तर भूक मंदावणे, अकारण उलटी, हातापायांसह चेहऱ्यावर सूज येण्यापासून तर थकवा या लक्षणांसहित मधुमेह, रक्तदाब, मुतखडा, जंतूसंसर्ग ही किडनी विकाराची लक्षणे आहेत. किडनी निकामी झाल्यामुळे महाराष्ट्रात चार हजार व्यक्ती किडनीच्या प्रतीक्षेत डायलिसिसवर आयुष्य जगत आहेत. 

पश्‍चिम विदर्भातील आसोला गावात किडनीग्रस्तांचा आकडा फुगत असल्याचा गौप्यस्फोट दै. सकाळने केल्यानंतर नागपुरातील नेफ्रॉलॉजी सोसायटीने या वृत्ताची दखल घेतली. आसोला गावातील किडनी विकारांची कारणमीमांसा करण्यासाठी हे गाव दत्तक घेण्यात येईल. या गावातील १४०० व्यक्तींच्या तपासणीनंतर आढळून आलेल्या तथ्यांवर विदर्भातील ६० हजार व्यक्तींची तपासणी करण्यासंदर्भात पावले उचलण्यात येतील. याच पार्श्‍वभूमीवर आसोला गावाला केंद्रस्थानी ठेवून नागपुरात किडनी परिषद रविवारी होत आहे.

दै. सकाळने किडनीग्रस्तांचे आसोला गाव असे वृत्त प्रकाशित केल्यामुळे यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने दखल घेतली. गावातील रुग्णांची तपासणी केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या पुढाकारातून आकडेवारी गोळा केली. क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी निकामी झालेल्यांची तसेच किडनी विकारग्रस्तांची आकडेवारी फुगल्याचे दिसून आले. १०० पैकी १८ व्यक्तींमध्ये किडनी विकाराची लक्षणे आढळून आल्याचे नोंदवले गेले. याशिवाय १४ जणांच्या मृत्यूस किडनी विकार असल्याचेही वास्तव पुढे आले आहे. शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी व पालकमंत्री मदन येरावार यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी याची विशेष दखल घेतली. त्यानंतर नागपूरच्या नेफ्रॉलाजी सोसायटीच्या पुढाकारातून पश्‍चिम विदर्भातील किडनी विकाराच्या कारणांचा शोध घेण्यासंदर्भात प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आज किडनी परिषद
नागपूर नेफ्रॉलॉजी सोसायटीतर्फे रविवारी (ता. एक) नागपूर येथील चिटणवीस केंद्रात किडनी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत नेफ्रॉलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. समीर चौबे, सचिव डॉ. मनीष बलवाणी, डॉ. निखिल किबे, डॉ. एस. जे. आचार्य, डॉ. सदानंद भुसारी, डॉ. प्रकाश खेतान, डॉ. धनंजय उखळकर, डॉ. टी. सी. राठोड, डॉ. व्ही. एल. गुप्ता, डॉ. धनंजय राजे मार्गदर्शन करतील. यानंतर दुसरी किडनी परिषद यवतमाळात होईल.

कोणत्याही आजाराचे ऑडिट करायचे असल्यासे किमान ६० हजार व्यक्तींचे स्क्रिनिंग व्हावे. परंतु सध्या आसोला याच गावात असे रुग्ण आढळून आले. यामुळे पहिल्या टप्प्यात १४०० व्यक्तींमधून सुरुवातीला २२० जणांची चाचणी केली जाईल. या व्यक्तीच्या स्क्रिनिंगनंतर पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये या आजाराची तपासणी करण्यात येईल.
- डॉ. मनीष बलवानी, सचिव, नागपूर नेफ्रॉलॉजी सोसायटी.

Web Title: nagpur vidarbha news 60000 person checking