बाजारपेठेत ७० टक्के ‘चायना आयटम’

नागपूर - येथील बाजारपेठेत विक्रीस आलेल्या चायना मॉडेलच्या वस्तू.
नागपूर - येथील बाजारपेठेत विक्रीस आलेल्या चायना मॉडेलच्या वस्तू.

नागपूर - विमान वगळता झोपेतून उठल्यापासून लागणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या क्षेत्रात चीनने घुसखोरी करीत भारतातील दोन लाख कोटींच्या व्यवसायावर वर्चस्व निर्माण केले आहे. या वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास भारतातील बंद पडलेले कुटीर उद्योग पुन्हा सुरू होतील. देशातील रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था सृदृढ होण्यास मदत होईल. त्यासाठी स्वदेशी जागरण मंचाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्वस्त माल, रंगीबेरंगी खेळण्यांसह इतरी वस्तूंच्या उपलब्धतेमुळे ग्राहकांचा ओढा चिनी वस्तूंकडेच आहे. परिणामी, भारतातील ७० टक्के बाजारपेठेवर चिनी वस्तूंनी वर्चस्व निर्माण केलेले आहे. 

सणासुदीच्या काळात गल्ल्या आणि मार्केट चिनी बनावटीच्या रंगीबेरंगी तोरणे, कंदील, दिवे, पणत्यांनी उजळून निघतात. ‘चायना आयटम’ने बाजारपेठ फुलून जाते. चीनमधील सेंजन, गोंजाव, इयू ही तीन प्रमुख शहरे देशातील चायना आयटमचे उगमस्थान आहे. दिवाळीच्या काळात चीनहून भारतात सरासरी चार ते पाच हजार कंटेनर भरून माल येतो. राज्यात न्हावा शेवा व मुंबई बंदरात कंटेनर येतात. यातील बहुतांश कंटेनरमध्ये कंदील, पणत्या, दिव्यांची तोरणे, एलईडी दिवे आणि लहानलहान इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंनी भरलेले असतात. चिनी बनावटीच्या दिव्यांची तोरणे लाखांमध्ये येतात. दिवाळीच्या काळात चीनवरून माल निर्यात करण्यासाठी गणपतीच्या काळातच कंटेनर बुक केले जाते. चीनमधील उत्पादक कंपन्यांचे लक्ष केवळ भारतच नाही, तर युरोप, अमेरिका, आफ्रिका, मध्य आशिया सर्वच खंडांमधील देशांवर असते. संपूर्ण जगाची बाजारपेठ डोळ्यांसमोर ठेवून वस्तूंचे उत्पादन केले जाते. प्रचंड प्रमाणात उत्पादन होत असल्याने त्याची किंमत स्वस्त होते. दिवाळीच्या काळात भारतीय बाजारपेठ तर डिसेंबरमध्ये ख्रिसमसची मोठी बाजारपेठ चिनी लोकांनी डोळ्यांसमोर ठेवली आहे. त्यानुसार ते निर्मिती करीत असतात. 

दरवर्षी चिनी वस्तूंची मागणी वाढतच आहे. नवनवे चिनी आयटम दिवाळीच्या काळात येतात. व्यापारी गणपती उत्सवानंतर चीनच्या वारीवर रवाना होतात. तेथील बाजारपेठा डोळे दिपवणाऱ्या आहेत. एक बाजारपेठ फिरण्यासाठी पाच दिवसही कामी पडतील. कोणत्याही प्रकारची वस्तू मागा, तत्काळ उपलब्ध होते. दिवाळीच्या काळात प्रामुख्याने कंदील, दिव्यांची रंगीबेरंगी तोरणे, दिवे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू व गिफ्ट आयटमना प्रचंड मागणी असते. एखाद्या मजल्यावर इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचीच सर्व दुकाने असतील. एखाद्या मजल्यावर दिव्यांची, तोरणांची दुकाने आहेत, असे मॉडर्न प्लास्टिक सेंटरचे संचालक अशोक संघवी म्हणाले. 

चिनी वस्तूंवर अघोषित बहिष्कार 
भारतातील ७० टक्के व्यापार चीनच्या ताब्यात असून, वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) जग एकाच कायद्यात बांधले गेले आहे. परिणामी, चीनचा माल बाजारात येणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीच चिनी वस्तूंच्या खरेदीवर अघोषित बंदी घालावी, असे मत अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com