अध्यक्षपदाची पंचरंगी लढत निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नागपूर - बडोद्यात होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (ता. 23) अंतिम दिवस होता; मात्र अपेक्षेप्रमाणे एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. यामुळे अध्यक्षपदाची लढत पंचरंगी होण्यावर शिक्‍कामोर्तब झाले. यानिमित्ताने विदर्भातील अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. किशोर सानप आणि डॉ. रवींद्र शोभणे या दोघांमधील टक्कर अनुभवता येणार आहे.

अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून 5 उमेदवारांनी 11 उमेदवारी अर्ज सादर केले. यात साहित्यिक समीक्षक डॉ. किशोर सानप, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, साहित्यिक रवींद्र गुर्जर, सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि कथालेखक व कादंबरीकार राजन खान यांचा समावेश आहे.

निर्धारित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत होती; परंतु यंदा उमेदवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून कुणीही माघार घेण्याची चिन्हे नव्हती. या अपेक्षेनुसार कुणीही नाव परत न घेतल्याने पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अढळ राहिले. याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक अधिकारी ऍड. मकरंद अग्निहोत्री म्हणाले, "निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे निश्‍चित असून, त्यांची यादी जाहीर करण्यात आली. 31 ऑक्‍टोबरपर्यंत रजिस्टर पोस्टाने सर्व 1072 मतदारांना मतपत्रिका पाठवल्या जाणार आहेत.'

निकाल 10 डिसेंबरला
बारा दिवसांत मतदारांना मतपत्रिका न मिळाल्यास त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना तसे अर्जाद्वारे कळवायचे आहे. अशा मतदारांना डुप्लिकेट मतपत्रिका पाठविल्या जातील. मतदान केलेल्या मतपत्रिका 9 डिसेंबरपर्यंत पोचणे अपेक्षित आहे. त्यानंतर आलेल्या मतपत्रिका विचारात घेतल्या जाणार नाहीत. मतमोजणी व निकाल 10 डिसेंबरला होणार असून, त्याच दिवशी संमेलनाध्यक्षांचे नाव जाहीर केले जाणार आहे.