उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार ‘ॲग्रोव्हिजन’चे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नागपूर - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.१०)  ‘ॲग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. रेशीमबाग मैदानावर दहा हजार चौरस मीटर परिसरात प्रदर्शनासाठी भव्य दालने उभारण्यात आली असून यंदाही विविध विषयांवरील  शेतीउपयोगी कार्यशाळा विशेष आकर्षण ठरणार आहे.

नागपूर - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.१०)  ‘ॲग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. रेशीमबाग मैदानावर दहा हजार चौरस मीटर परिसरात प्रदर्शनासाठी भव्य दालने उभारण्यात आली असून यंदाही विविध विषयांवरील  शेतीउपयोगी कार्यशाळा विशेष आकर्षण ठरणार आहे.

शुक्रवारी दुपारी ४ वाजता रेशीमबाग मैदानावर उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. यंदाच्या प्रदर्शनात चारशेपेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. कृषी क्षेत्रातील विविध नवनवीन उत्पादने व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, स्थानिक लघु उद्योग ते बचतगट अशा विविध वर्गांनी तयार केलेली उत्पादने, उपकरणे तसेच सरकारी योजनांची माहिती देणारे विविध स्टॉल प्रदर्शनात असतील, अशी माहिती ॲग्रोव्हिजनचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संयोजक गिरीश गांधी, आयोजन सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. १३ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, समारोपाला छत्तीसगड, हरयाना, मध्य प्रदेश व झारखंड राज्यांचे कृषिमंत्री  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसु नायक यांची विशेष उपस्थिती असेल. पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर सतीश होले, नगरसेविका उषा पॅलेट, दत्ता जामदार होते.

बांबूवर विशेष कार्यशाळा
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध विषयांवरील कार्यशाळा प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. यात विशेषत्वाने बांबूवर आधारित कार्यशाळा औत्सुक्‍याचा विषय ठरेल. शनिवारी (ता.११) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांच्या  हस्ते सुरेश भट सभागृहात कार्यशाळांचे उद्‌घाटन होईल. रविवारी (ता.१२) सकाळी ९.३० वाजता सुरेश भट सभागृहात विदर्भ दुग्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.