"बिग बी' साकारणार प्रा. बारसेंची व्यक्तिरेखा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर लवकरच चित्रपट; नागराज मंजुळेंचे दिग्दर्शन

फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर लवकरच चित्रपट; नागराज मंजुळेंचे दिग्दर्शन
नागपूर - फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्‌टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येत आहे. "सैराट'फेम नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारणार आहेत.

हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. झोपडपट्‌टीतील गुंड प्रवृत्तीच्या अनेक युवकांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणून त्यांचे करिअर सावरले. बारसेंच्या प्रशिक्षणाखाली घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला. गोरगरीब खेळाडूंचे प्रेरणास्रोत ठरलेल्या प्रा. बारसेंच्या जीवनावरील चित्रपटाचे दिग्दर्शन "सैराट'मुळे जगभर लोकप्रिय ठरलेले नागराज मंजुळे हे करणार असून, स्वत: "बिग बी' हे प्रा. बारसे यांची भूमिका साकारणार आहेत.

"सकाळ'शी बोलताना प्रा. बारसे म्हणाले, ""माझ्या जीवनावर चित्रपट येतो आहे, याचा मला व्यक्‍तीश: आनंद आहे; पण कौतुक नाही. चित्रपटाच्या माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत जात असतील तर, त्यात निश्‍चितच समाधान आहे. या चित्रपटाशी अमिताभ आणि नागराज मंजुळेंसारख्या दोन मोठ्या व्यक्‍ती जुळणे, हा केवळ माझाच नव्हे, नागपूरकरांचा गौरव आहे.''

"फिफा' व "रिअल हिरो' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह देशविदेशातील अनेक मानसन्मान प्रा. बारसे यांनी प्राप्त केले आहेत.

"बिग बी' घेणार शाहरुखकडून धडे
ही भूमिका साकारण्यासाठी अमिताभ बच्चन शाहरुखची मदत घेणार असल्याची माहिती आहे. शाहरुखने "चक दे इंडिया' या चित्रपटात हॉकी प्रशिक्षकाची भूमिका केली होती.