रंगभूमीबरोबरच सामाजिक भान जपते ‘अस्मिता रंग’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - रंगभूमी माझा श्‍वास आहे. रंगभूमीवर अभिनय करतानाच आपण समाजाचेही देणे लागतो, या भावनेतून आपल्यासारख्याच काही कलावंतांना सोबत घेऊन ‘अस्मिता रंग’ या सामाजिक भान जपणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजप्रबोधनात्मक नाटके बसवली आणि पुण्या-मुंबईव्यतिरिक्‍त ती गावागावांत सादर करून आम्ही कलावंत समाजजागृतीचे कार्य करीत आहोत, असे ‘अस्मिता रंग’च्या संस्थापिका आणि कलावंत अस्मिता मिराणे यांनी सांगितले. आज त्यांनी आणि दिग्दर्शक संजय गायकवाड यांनी ‘सकाळ संवाद’साठी सकाळ कार्यालयाला भेट दिली.

अण्णा हजारेंचे आंदोलन सुरू असताना अस्मिता रंगच्या माध्यमातून ‘अण्णांचा कायदा-जनतेचा फायदा’ ही नाटिका बसवून अस्मिता रंगने जनजागृती केली होती. महाराष्ट्रात सर्वदूर शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असताना शेतकऱ्यांना यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने लाखमोलाची गोष्ट ही दीड तासाची नाटिका बसवली. त्यातून मिळणाऱ्या मानधनातून कलावंतांनी शेतकरी कुटुंबांना वस्तुस्वरूपात मदत करून समाजभान जपले होते, असेही अस्मिता यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रातील बदलत्या नीतिमूल्यांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘मास्तरांची शाळा’ या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गायकवाड करणार आहेत. या चित्रपटाची गाणी तयार झाली असून त्याला संजय गायकवाड यांचेच संगीत आहे. हा चित्रपट मनोरंजनासाठी नसून समाजाला संदेश देणे हा या उद्देश असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले.

या वेळी अस्मिता मिराणे आणि संजय गायकवाड यांना ‘सकाळ सोशल कल्चरल क्‍लब’चे सदस्यत्व देण्यात आले. कला सागर या संस्थेच्या वतीने आयोजित बहुभाषी नाट्यमहोत्सवात आज अस्मिता आणि संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.