बस जाळली, तमिळनाडू एक्‍स्प्रेस रोखली

कामठी रोड - आंदोलकांनी तमिळनाडू एक्‍स्प्रेस रोखून घोषणा देत मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले.
कामठी रोड - आंदोलकांनी तमिळनाडू एक्‍स्प्रेस रोखून घोषणा देत मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले.

इंदोऱ्यात दिवसभर तणाव - ॲट्रॉसिटीचे आंदोलन पेटले
नागपूर - ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा तसेच न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी याकरिता आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद  दरम्‍यान आंदोलकांनी बस जाळून, तोडफोड तसेच रेल्वे रोखून आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांनी इंदोरा मैदान परिसरात  बसची जाळपोळ केली. परिवहन महामंडळाच्या दोन तर शहर बस सेवेतील दोन अशा एकूण चार बसेसची तोडफोड केली. तसेच तमिळनाडू एक्‍स्प्रेस रोखून मालगाडीच्या काचा फोडल्या आणि इंजिनचालकांशी धक्काबुक्की केली.

शहर बस सेवेतील एमएच ३१- ४०७ क्रमांकाची जरीटक्‍याहून सोनेगावला जाणारी बस इंदोरा मैदान परिसरातून जात होती. आंदोलकांनी बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडले. यानंतर तुफान दगडफेक करीत बसच्या सर्वच काचा फोडण्यात आल्या. यानंतर ज्वलनशील द्रव्य टाकून आग लावून देण्यात आली. यामुळे दोन सिट्‌स जळाल्या. कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर कामठीला जाणारी एमएच ३१- ६१४१ क्रमांकाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. यात समोरची काच फुटून नुकसान झाले. दोन्ही बसेस  जरीपटका ठाण्यात जमा करण्यात आल्या. 

या घटनेनंतर उत्तर नागपूरसह शहरातील संवेदनशील भागातील बससेवा थांबविण्यात आली. यामुळे शाळा, कॉलेजमधून घरी परतणारे विद्यार्थी, चाकरमान्यांनाही गैरसोयींचा सामना करावा लागला. 

एसटी महामंडळाच्या एमएच ४० -६३८७ आणि एमएच ४० -८४७२ क्रमांकांच्या बसेसवर एलआयसी चौक आणि कडबी चौकात दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. दोन्ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडल्या असून दोन्ही बसेस सावनेर डेपोच्या आहेत. 

आंदोलकांची इंजिनचालकाला धक्काबुक्की
आंदोलकांनी कामठी मार्गावरील गुरुद्वारा पूल परिसरात तमिळनाडू एक्‍स्प्रेस रोखून धरली. जवळच सिग्नलच्या प्रतीक्षेत उभ्या मालगाडीवर दगडफेक करीत मालगाडीच्या इंजिनची काच फोडली. आंदोलकांनी दोन्ही गाड्यांच्या इंजिनचालकांशी धक्काबुक्कीही केली. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून आंदोलकांना पिटाळून लावले.

आक्रमक आंदोलकांनी दुपारी इंदोरा चौकात बस पेटवली. त्यानंतर मोटारसायकलने संविधान चौकाच्या दिशने निघाले. पावणेतीन वाजताच्या सुमारास दिल्ली रुटने नागपूर स्थानकाच्या दिशेने येणारी मालगाडी गुरुद्वारा पूल परिसरात सिग्नलच्या प्रतीक्षेत उभी होती. आंदोलक गाडीपुढे उभे राहून फोटो काढून घेण्याच्या बेताने पुलावर चढले. एका मागोमाग असे सुमारे शंभर ते दीडशेचा जमाव गोळा झाला. त्याचवेळी गाडीला हिरवा सिग्नल मिळाला. मात्र, गाडीपुढे गर्दी असल्याने चालक घरडे गाडी पुढे नेऊ शकले नाही. काही उत्साही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यात गाडीची काच फुटली. भीतीमुळे घरडे बाहेर आले असता त्यांना धक्कबुक्की करण्यात आली. त्याचवेळी नागपूरहून दिल्लीकडे रवाना झालेली चेन्नई-नवी दिल्ली तमिळनाडू एक्‍स्प्रेस जात होती. मालगाडीसह दोन्ही ट्रॅकवर आंदोलक हातात झेंडे, बॅनर घेऊन उभे दिसल्याने इंजिनचालक वीरेंद्र सिंग यांनी गाडी थांबविली. आंदोलक या गाडीपुढेही जाऊन उभे राहिले. वीरेंद्रसिंग यांनाही धक्काबुक्की केल्याने त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिस घटनास्थळ गाठून आंदोलकांना हुसकावून लावले. यामुळे गाडी चोवीस मिनिटे तिथेच खोळंबली. वेळीच धरपकड करण्यात आली नसली तरी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून आंदोलकांवर नियमानुसार कारवाई करण्याची तयारी करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com