बॅंकांनी मुद्रा योजनेला प्राधान्य द्यावे - हंसराज अहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नागपूर - युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासोबतच छोट्या उद्योगांच्या विस्तारासाठी मुद्रा योजनेचा माध्यमातून सुलभपणे कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी मुद्रा योजनेतील संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, बॅंकांनीही युवा उद्योजक व कारागिरांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

राज्यस्तरीय बॅंकर समिती महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुद्रा मेळाव्याचे आयोजन देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर खासदार अजय संचेती, कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, आमदार गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता होते. अहीर म्हणाले की, बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेसारखी महत्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेमध्ये सर्व बॅंकांनी सक्रिय सहभाग देण्याची आवश्‍यकता आहे. जनधन योजनेमध्ये ३० कोटी नवीन बॅंक खाते उघडण्यात आले असून, या योजनेचा लाभ या माध्यमातून मिळणे सूलभ झाले आहे. मेक इन इंडिया व स्किल इंडियाच्या माध्यमातून स्वत:चा उद्योग सुरु करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

शेतीसोबत दूधउत्पादनासह पूरक उद्योग सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन आर्थिक विकास साधल्यास शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य येणार नाही. ग्रामीण भागातील लहान उद्योगासोबतच कारागिरांनीही मुद्रा योजनेच्या माध्यमातून विविध  उत्पादन केल्यास बाजारपेठेत वस्तूंची आयात करावी लागणार नाही, असे आवाहन अहीर यांनी केले. पालकमंत्री बावनकुळे यांनी तालुका पातळीवर मेळावे आयोजित करण्याच्या सूचना केली. 

मुद्रा योजनेअंतर्गत प्रशांत हाडके, शंभर उमरेडकर, श्रीधर उबले, राजकुमार जगणे, प्रवीण कांबळे यांना कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले. यावेळी मुद्रा योजनेचे लाभार्थी प्रदीप मेश्राम व निशिगंधा राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन शुभांगी रायले यांनी केले, तर आभार लीड बॅंक व्यवस्थापक अयुब खान यांनी मानले.