नोकरीचे आमिष देऊन तीन लाखांनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नागपूर - बेरोजगार मुलाला पंजाब नॅशनल बॅंकेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन एका महिलेची तीन लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी प्रतिभा मुकेश बोरकर (५०, गड्डीगोदाम) यांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बिंदू प्रमोद गजभिये (४५, रा. खलाशी लाइन) असे आरोपीचे नाव आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरकर यांची आरोपी बिंदू गजभिये हिच्याशी जुनी ओळख आहे. बिंदूने बोरकर यांच्या मुलाला पंजाब नॅशनल बॅंकेत चपराशीपदी नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. त्यासाठी दहा लाखांची मागणी केली. सुरुवातीला तीन लाख व नोकरी लागल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास गजभिये हिने बोरकर यांना सांगितले. मुलाला बॅंकेत नोकरी लागणार, या आशेने बोरकर यांनी १ नोव्हेंबर २०१६ रोजी गजभियेला तीन लाख रुपये दिले. रक्कम मिळूनही गजभिये हिने कोणत्याही प्रकारचे नियुक्‍तिपत्र किंवा नोकरीचे समाधानकारक उत्तर बोरकर यांना दिले नाही. बोरकर यांनी मुलाच्या नोकरीबाबत गजभिये यांना वारंवार विचारपूस केली; मात्र विविध कारणे सांगून गजभियेने बोरकर यांना टाळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी गजभियेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सुरू आहे.

तीन लाखांत बांधले घर
बिंदूने प्रतिभा यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले. पहिल्याच आठवड्यात तिने सिमेंट आणि विटा विकत घेतल्या. त्यानंतर तीन महिन्यांत स्वतःचे घर बांधले. त्यामुळे केवळ घर बांधण्यासाठीच बोरकर यांना फसविल्याची माहिती समोर आली आहे.