नागपुरातील व्यापाऱ्याची एक कोटीची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नागपूर - उपराजधानी नागपूरमधील साखर व्यापाऱ्याला तब्बल एक कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सोलापूर येथील भीमा सहकारी साखर कारखाना, कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि कोल्हापूरच्या पार्श्‍वनाथ एंटरप्रायजेसच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेशकुमार गिरधारीलाल जेजानी असे तक्रारकर्त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये सोलापूर येथील भीमा साखर कारखान्याच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला. केवळ दोन हजार 450 रुपये प्रतिक्विंटल दराने 10 हजार क्विंटल साखर उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. जेजानी यांनी हा दर मान्य केला. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक ई. जी. सदानंद यांनीही या व्यवहाराबाबत बोलणी करून पैसे जमा करताच साखर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. कोल्हापूरच्या विनय सनके यांच्या मालकीच्या पार्श्‍वनाथ एंटरप्रायजेसमार्फत त्यांना साखर पाठविण्यात येणार होती. आरोपींच्या मागणीनुसार जेजानी यांनी दोन कोटी 45 लाख रुपये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बॅंक खात्यात जमा केले. यानंतरही आरोपींनी साखरेची खेप पाठविली नाही. जादा भावाने साखर खरेदी करायला लावत 2.45 कोटींपैकी एक कोटी 45 लाख रुपये परत केले. उर्वरित एक कोटी अजूनही आरोपींनी परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जेजानी यांनी नंदनवन पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.