मायक्रोचिप टाकून ग्राहकांशी चिटिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मानकापुरातील पेट्रोलपंपावर पोलिसांचा छापा - ठाणे क्राइम ब्रॅंचची कारवाई

नागपूर - मानकापुरातील एका पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा घातला. पेट्रोलपंपावरील दोन मशीनमध्ये सेटिंग करून ग्राहकांची फसवणूक केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पेट्रोलपंपावर सील करण्याची कारवाई करण्यात आली. या छाप्यामुळे शहरातील अनेक पेट्रोलपंपचालकांचे धाबे दणाणले. 

मानकापुरातील पेट्रोलपंपावर पोलिसांचा छापा - ठाणे क्राइम ब्रॅंचची कारवाई

नागपूर - मानकापुरातील एका पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा घातला. पेट्रोलपंपावरील दोन मशीनमध्ये सेटिंग करून ग्राहकांची फसवणूक केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पेट्रोलपंपावर सील करण्याची कारवाई करण्यात आली. या छाप्यामुळे शहरातील अनेक पेट्रोलपंपचालकांचे धाबे दणाणले. 

मानकापुरात झिंगाबाई टाकळी परिसराच्या प्रवेशद्वारासमोरच भाजपचे नेते नवनीतसिंग तुली यांच्या मालकीचे रबज्योत पेट्रोलपंप आहे. येथे चार पेट्रोल वेंडिंग मशीन आहे. ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सोमवारी दुपारी छापा घातला. चारही मशीनची तपासणी करण्यात आली. या वेळी दोन मशीनमधून पाच लिटर पेट्रोल झिरो सेट केल्यानंतर काढण्यात आले. एका मशीनमधून पाच लिटर पेट्रोल काढल्यानंतर ते केवळ ४ लिटर ८००  मिली तर दुसऱ्यामधून ४ लिटर ७८० मिली पेट्रोल बाहेर पडले. त्यामुळे दोन्ही पेट्रोल वेंडिंग मशीनमधून १० लिटर पेट्रोलवर ४२० मिली पेट्रोल कमी भरले. ही बाब लक्षात घेता पेट्रोल वेंडिंग मशीनची तपासणी केली असता मशीनमधून एक विशिष्ट इलेक्‍ट्रॉनिक मायक्रोचिप  बसवलेली आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही मशीनला सील ठोकण्यात आले आहे. 

दोन मशीनवर कारवाई
ठाणे गुन्हे शाखेच्या तावडीत एक आरोपी सापडला. त्याने विशिष्ट इलेक्‍ट्रॉनिक मायक्रोचिप तयार केली असून ती पेट्रोल पंपमालकांना विकल्याची कबुली दिली. त्यानुसार ठाण्यातील एका पेट्रोलपंपावर गुन्हे शाखेने छापे घातले. यामध्ये इलेक्‍ट्रॉनिक चिपमधून प्रतिलिटरवर पाच रुपयांचे पेट्रोल कमी दिल्या जात असल्याचे आढळून आले होते. त्या आरोपीने नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पेट्रोलपंप मालकांना ही मायक्रोचिप विकल्याची माहिती दिली. त्यावरून ठाणे गुन्हे शाखेने नागपुरातील नवनीत तुली याच्या पेट्रोलपंपावर छापा घालून दोन मशीनवर कारवाई केली.

पेट्रोल विक्रेत्यांनी घेतली धास्ती
मानकापुरातील नवनीत तुलीच्या पेट्रोलपंपावर छापा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. त्यामुळे ‘मापात-पाप’ करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोलपंप मालकांनी चांगलीच धास्ती घेतली होती. ज्या संचालकांनी पंपावर मायक्रोचिप बसवलेली आहे. त्यांनी  लगेच ‘पंप दुरुस्ती’चे बोर्ड लावले होते. तर, काहींनी ‘पेट्रोल नाही’ असे फलक लावले होते. त्यावरून अनेकांनी धास्ती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पंप कर्मचाऱ्यांची बनवाबनवी
शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर ग्राहकांची फसवणूक केली जाते. अनेक वेळा पंपावरील कर्मचारी हाताला झटका देऊन तर कधी बोलण्यात गुंतवून ठेवल्यानंतर पेट्रोल कमी भरतात. अनेकवेळा पंपावरील कर्मचाऱ्यांशी ग्राहकांचा वाद होतो. मात्र, तेथील सर्वच कर्मचारी तक्रारकर्त्या ग्राहकावर तुटून पडतात. त्यामुळे वाहनचालक एकटा पडल्याने माघार घेतो. कधी पंपमालकांचाही हिस्सा असल्यामुळे तक्रार आल्यानंतरही कोणतीही कारवाई पंप कर्मचाऱ्यांवर केली जात नसल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

वैध मापनशास्त्र विभाग अनभिज्ञ
पेट्रोल पंपावरील योग्यता व प्रमाण तपासण्यासाठी वैधमापन विभाग कार्यरत आहे. मात्र, या विभागाने आतापर्यंत कोणतीही विशेष कारवाई केली नाही. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांची पेट्रोल पंप चालकांशी ‘सेटिंग’ असल्याचा आरोप नेहमी होतो. त्यामुळे ठाणे गुन्हे शाखेने वैधमापन विभागाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता अचानक छापामार कारवाई केली.  त्यामुळे तुली पेट्रोल पंपावरील पाप उघडकीस आले.

कमाई कोट्यवधीत 
ठाणे गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या आरोपीने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पेट्रोल पंपमालकांच्या भेटी घेऊन मायक्रो चिप विकली. त्यासाठी त्याने लाखांत घसघशीत रक्‍कम घेतली. मात्र, पेट्रोलपंप संचालकांनी आतापर्यंत सामान्य नागरिकांची पिळवणूक करीत कोट्यवधी रुपयांची  कमाई केली. त्याचा सरळ भुर्दंड सामान्य नागरिकांच्या खिशावर पडला.