कलचाचणीच्या निकालावर आता मुख्यमंत्र्यांचा फोटो!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

गुणपत्रिका प्रचाराचे माध्यम आहे का? शिक्षक संघटनांची टीका

नागपूर - प्रचाराची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपने आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नेत्यांचे फोटो प्रकाशित करणे सुरू केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कल चाचणी परीक्षेच्या निकालाच्या गुणपत्रिकेवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो छापण्यात आला आहे. गुणपत्रिकेच्या माध्यमातून भाजपने प्रचार सुरू केला काय? अशी टीका शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. 

गुणपत्रिका प्रचाराचे माध्यम आहे का? शिक्षक संघटनांची टीका

नागपूर - प्रचाराची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपने आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नेत्यांचे फोटो प्रकाशित करणे सुरू केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कल चाचणी परीक्षेच्या निकालाच्या गुणपत्रिकेवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो छापण्यात आला आहे. गुणपत्रिकेच्या माध्यमातून भाजपने प्रचार सुरू केला काय? अशी टीका शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी परीक्षा घेण्यात आली. शनिवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजता शिक्षणमंडळातून दहावीच्या गुणपत्रिकेसोबतच कलचाचणीचा निकाल हाती पडताच अनेकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. गतवर्षी कलचाचणीच्या निकालावर शिक्षणमंत्र्यांच्या फोटो आल्याने वाद निर्माण झाला असता. तो फोटो काढण्याऐवजी शिक्षण विभागाने त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही फोटोचा समावेश केला. 

शालेय शिक्षण विभागाने १० नोव्हेंबर २०१५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील इयत्ता दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचे ठरविले होते. सदर कलचाचणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. राज्यातून एकूण १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरविण्यास मदत होणार आहे. गतवर्षीही निकालानंतर देण्यात आलेल्या कलचाचणीच्या निकालाच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा फोटो असल्याने वाद उफाळला होता. त्यावर विरोधीपक्षाने शासनाला घेरले होते. त्यामुळे यावर्षीच्या प्रमाणपत्रावर कुठलाच फोटो राहणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र, कुठल्याच प्रकारचा विरोध न जुमानता विभागाने मुजोरी कायम ठेवून शिक्षणमंत्र्यासोबत यावेळी मुख्यमंत्र्यांचा फोटोही या प्रमाणपत्रावर लावला. या प्रकाराने शिक्षक संघटनांमध्ये बराच रोष आहे. शिक्षणात राजकारण होऊ नये याबद्दल एकीकडे बोलत असताना, त्याच शिक्षणातील प्रमाणपत्रावर अशा प्रकारे फोटो लावण्याचे काम शासन करीत असल्याचे दिसून येत आहे. 

शिक्षणावर राजकारणाचा प्रभाव असल्यापेक्षा राजकारणावर शिक्षणाचा प्रभाव असावा असे ठाम मत आहे. मात्र, अशाप्रकारे शैक्षणिक प्रमाणपत्रावर राजकारण्यांचे फोटो लावणे हे योग्य नाही. यामुळे समाजात वेगळा संदेश जातो. यापूर्वीच वाद असताना, पुन्हा या प्रकाराने त्यात भर पडण्याची शक्‍यता आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर राजकारण्याचा फोटो नव्हता तेवढे नियम पाळायला हवेत.
- नागोराव गाणार, शिक्षक आमदार

शासन हे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील मतदार बनविण्याची सुरवात करीत आहे. एकीकडे कलचाचणीतून काहीही निष्पन्न होत नसताना ती राबविल्या जाते. प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्याच्या फोटोबद्दल वाद झाला असताना, मुजोरीने पुन्हा त्यात मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचा प्रकार हा शैक्षणिक क्षेत्रात बराच निंदनिय आहे.
- पुरुषोत्तम पंचभाई, राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल.