विहीर खचल्याने चिमुकल्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

नागपूर - घराच्या अंगणातील विहीर खचल्यामुळे त्यात बुडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना मानकापूर परिसरात घडली. मुलाला वाचवण्यासाठी धावलेले त्याचे आई, वडील आणि आजी व आजोबा हे थोडक्‍यात बचावले. अंकुश सुधीर चौधरी असे मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

नागपूर - घराच्या अंगणातील विहीर खचल्यामुळे त्यात बुडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना मानकापूर परिसरात घडली. मुलाला वाचवण्यासाठी धावलेले त्याचे आई, वडील आणि आजी व आजोबा हे थोडक्‍यात बचावले. अंकुश सुधीर चौधरी असे मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

मानकापुरातील गायत्रीनगरात सुधीर चौधरी भाड्याने राहतात. त्यांच्यासोबत वृद्ध वडील यादव चौधरी, पत्नी सुरेखा, दोन मुले वेदांत (वय ८) आणि अंकुश (वय २) यांचा समावेश आहे. घराशेजारी सुरेखा यांची वृद्ध मावशी मंदा महाजन राहते. सुधीर हे पूर्वी स्टार बसमध्ये तिकीट तपासणीस म्हणून नोकरीला होते. मात्र, गेल्या महिन्यापासून त्यांनी रिलायन्सचे टॉवर बांधकामाचे ठेके घेणे सुरू केले. गुरुवारी सकाळी वेदांत शाळेत गेला होता, तर अंकुश हा घरासमोर खेळत होता. दरम्यान, तो धोकादायक असलेल्या विहिरीजवळ गेला. त्याच्या भाराने दलदलीत असलेल्या विहिरीचे कठडे खचले आणि चिमुकल्यासह पाण्यात पडले. मोठा आवाज आल्याने अंगणातच उभ्या असलेल्या आजोबाने विहिरीकडे धाव घेतली. नातू पडल्यामुळे त्यांनी विहिरीत उडी घेतली. दरम्यान, घरात चहा घेत असलेले सुधीर यांच्या लक्षात प्रकार आला. दोघांनाही विहिरीत बुडताना पाहून त्यांनीही उडी घेतली. त्याचवेळी आरडाओरडा झाल्यामुळे सुरेखा आणि शेजारी राहणारी मावशी मंदा या दोघींनी विहिरीत पडलेल्यांना काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमीन खचल्याने त्यास दलदलीत फसल्या. विहिरीतील पाणी गढूळ झाल्याने अंकुश पाण्यात दिसत नव्हता. त्याचा शोध सुधीर आणि त्यांचे वडील घेत होते. मात्र, त्यांच्या हाती निराशा आली.

चिमुकल्याचा जीव गेला
गढूळ पाण्यात जवळपास दोन तासांपर्यंत चिमुकल्याचा शोध घेण्यात आला. पण, तो आढळला नाही. यादरम्यान अग्निशमन दल पोहोचले. त्यांनी चिमुकल्याचा शोध घेतला. बेशुद्धावस्थेत चिमुकल्याला विहिरीतून बाहेर काढले. त्याला लगेच पोलिस वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शेजाऱ्यांचे प्रयत्न फळले
एकाच कुटुंबातील पाच जण खचलेल्या विहिरीत पडल्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, त्यांचे शेजारी एकजुटीने काम करीत मदतीस धावले. विहिरीच्या खालच्या बाजूस अडकलेल्या सुरेखा आणि मंदा महाजन यांना सर्वप्रथम नागरिकांनी बाहेर काढले. कंबरेला दोर बांधून विहिरीतून वृद्ध यादव यांना बाहेर काढले. खचलेल्या विहिरीचा मलबा हटविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मदत केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घरमालकाचा हट्ट जीवावर बेतला
गेल्या आठ दिवसांपासून दलदल जागेवर असलेल्या विहिरीचा मलबा थोडा थोडा खचत होता. याबाबत घरमालक कुंभरे यांना माहिती दिली. मात्र, त्यांनी पुढच्या आठवड्यात बघू अशी भूमिका घेतली. त्यांचा निष्काळजीपणा चिमुकल्याच्या जीवावर बेतला. दोन दिवसांपासून पाऊस असल्यामुळे विहिरीच्या शेजारची जागा उभे राहण्यासही धोकादायक होती.