चौकाचे झाले हौद

रेशीमबाग चौक - चौकात आयब्लॉक लावण्याचे टाळण्यात आल्याने वाहनधारकांना दोनदा दचके सहन करावे लागत आहेत.
रेशीमबाग चौक - चौकात आयब्लॉक लावण्याचे टाळण्यात आल्याने वाहनधारकांना दोनदा दचके सहन करावे लागत आहेत.

सिमेंट रस्त्यांवरून वृद्ध, गर्भवतींचा प्रवास धोक्‍याचा

नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते करण्यास महापालिकेने प्राधान्य दिले.  परंतु, पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्यांने प्रवास केल्यास प्रत्येक चौकात हौद तयार झाल्याचे चित्र आहे. प्रशासन व कंत्राटदाराच्या या दोषपूर्ण कामामुळे चौक ओलांडताना दचके सहन करावे लागत आहे. परिणामी वृद्ध, गर्भवती महिलांचा चारचाकी किंवा दुचाकीवरून प्रवास धोक्‍याचा झाला आहे. पावसाळ्यात तर या चौकांमध्ये पाणी साचल्याने वाहने काढणेही कठीण झाल्याने नागरिक ‘असले रस्ते काय कामाचे’ असा त्रागा करीत प्रशासनाच्या नावाने बोटे मोडीत आहे.

शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार होत आहे. पहिल्या टप्प्यात २५, दुसऱ्या टप्प्यात ७० किमी रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली. यातील निम्मे कामे पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या टप्प्याचेही कामे सुरू करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. शहरात तयार झालेले सिमेंट रस्ते केवळ चौकापर्यंत किंवा चौकापासून पुढे तयार करण्यात आले आहे. सिमेंट रस्ते उंच झाल्याने चौकांमध्ये मोठा गोल  खड्डा तयार झाला असून, पावसाळ्यात हौदाचेच चित्र दिसून येत आहे. पाच ते सहा किमी अंतराच्या सिमेंट रस्त्यांवर असे ८ ते ९ चौक येतात. परंतु, बहुतेक चौकांचे हौद झाले आहे.  ग्रेट नाग रोडने प्रवास केल्यास रेशीमबाग चौक, जगनाडे चौकाचे हौद झाले आहेत. या एकाच रस्त्यावरून केडीके कॉलेजपर्यंत किंवा या कॉलेजपासून बसस्थानकापर्यंत प्रवास केल्यास या दोन्ही चौकातून नागरिकांना प्रत्येकी दोन दचके सहन करावे लागत आहे. अशीच स्थिती रिंग रोडसह व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी चौक, लक्ष्मीनगर चौक, गजानन चौक, खामला चौकासह अनेक नव्या रस्त्यातील चौकांतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसोबतच वृद्ध आणि गर्भवती महिलांनाही असह्य दचक्‍यांचा त्रास होत आहेत. या दचक्‍यांमुळे वृद्ध नागरिकांना उतारवयात मणक्‍यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. चौकातील या हौदांमुळे गर्भवती महिलेची प्रसूती रस्त्यांवर होऊन तिच्यासह बाळाला कमी जास्त झाल्यास जबाबदार कोण? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

खर्च वाचविण्याच्या प्रयत्नात प्रशासन 
सिमेंट रस्ते तयार करताना बाजूला सुटलेल्या जागेवर आयब्लॉक लावण्यात येतात. चौकांमध्येही सिमेंट रस्ते तयार झाल्यानंतर लगेच आयब्लॉक लावण्याची तरतूद आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांतील चौकांमध्ये आयब्लॉक लावण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कंत्राटदार व प्रशासन चौकात आयब्लॉक बसविण्याचा खर्च वाचवून नागरिकांचा जीव धोक्‍यात घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाने नमूद केले. 

आपल्याच पाठीवर थाप 
दोन टप्प्यातील पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्यांचे प्रशासन, महापालिका पदाधिकारी आणि शहरातील सर्वच मोठे नेते गुणगान करीत आहेत, स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. तज्ज्ञ अधिकारी, अभियंत्यांची फौज असलेल्या महापालिकेच्याही लक्षात ही चूक येऊ नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  
 

अपघाताची टांगती तलवार 
चारही बाजूचे सिमेंट रस्ते उंच झाल्याने चौकात तयार झालेला खोलगट भाग ओलांडून पुढे  जाताना दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना चांगलीच जोखीम पत्करावी लागत आहे. कुटुंबासोबत दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांना खोलगट भागात उतरताना व पुन्हा सिमेंट रस्त्यांवर चढताना लहान मुलांना अक्षरशः हाताने पकडावे लागत आहे. त्यातच मागील वाहनधारकाने धक्का दिल्यास दुचाकीवरील कुटुंब खाली पडून अपघाताची शक्‍यता बळावली आहे. 

खड्डे लहान असो वा मोठे, त्यातून प्रवास घातकच आहे. उंच सिमेंट रस्त्यावरून खाली वाहन उतरविताना दचके लागल्यास मणक्‍याचा त्रास होऊ शकतो. नेहमीच्या दचक्‍यामुळे स्पॉन्डिलायटीसचा आजार कायमचा होऊ शकतो. ज्यांच्या वाहनांचे शॉकअप चांगले असेल त्यांना कमी धोका आहे. परंतु, इतरांना त्रास वाढण्याची शक्‍यता आहे. 
- डॉ. त्रिलोक उमरे, अस्थितज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com