शहर बसमध्ये कंडक्‍टर तिकीटच देत नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - शहरातील ‘आपली बस’मध्ये २ ऑक्‍टोबरपासून तिकीट दरात ५० टक्के सवलतीचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले. ही सुविधा देतानाच महापालिकेने बसमध्ये तिकिटाचे पैसे घेतल्यानंतर ती देणेही आवश्‍यक असल्याचे त्यातील कंडक्‍टरच्या डोक्‍यात बिंबवणेही आवश्‍यक असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी नमूद केले. ज्येष्ठ नागरिकांची ही लूट रोखण्यासंबंधात उपाययोजनेची गरज त्यांनी व्यक्त केली. 

नागपूर - शहरातील ‘आपली बस’मध्ये २ ऑक्‍टोबरपासून तिकीट दरात ५० टक्के सवलतीचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले. ही सुविधा देतानाच महापालिकेने बसमध्ये तिकिटाचे पैसे घेतल्यानंतर ती देणेही आवश्‍यक असल्याचे त्यातील कंडक्‍टरच्या डोक्‍यात बिंबवणेही आवश्‍यक असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी नमूद केले. ज्येष्ठ नागरिकांची ही लूट रोखण्यासंबंधात उपाययोजनेची गरज त्यांनी व्यक्त केली. 

परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी २ ऑक्‍टोबरपासून शहर बससेवेत अटलबिहारी वाजपेयी ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासी तिकीट दरात ५० सूट देण्याची घोषणा केली. बंटी कुकडे यांच्या पुढाकाराचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले. मात्र, त्याचवेळी ही योजना केवळ कागदावरच राहू नये, अशी अपेक्षाही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

शहरातील अनेक बसमध्ये नागरिकांकडून तिकीटचे पैसे घेतले जातात, मात्र, त्यांना तिकीट दिले जात नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. याशिवाय शहर बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी चालकांच्या पाठीमागील दोन ते पाच आसन ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित करण्यात यावे, असेही काहींनी सुचविले. बसमधील आसनावर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षण स्पष्ट लिहिले असते. परंतु, प्रवासी आधीच त्यावर बसून जातात. ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. यासाठी कंडक्‍टरने ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याची गरज आहे. मात्र, कंडक्‍टर अनेकदा या जबाबदारीपासून पळ काढतो किंवा ज्येष्ठ नागरिकांना टाळतो, असे काही ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले. 

तिकीट न दिल्यास तक्रारीची सुविधा
बसमध्ये प्रवास करताना कंडक्‍टरने तिकीट न दिल्यास नागरिकांनी परिवहन तक्रार निवारण केंद्रातील ०७१२-२७७९०९९ या क्रमांकावर फोन करावा, असे आवाहन बंटी कुकडे यांनी केले आहे. नागरिकांनी कंडक्‍टरला तिकीट मागावे न दिल्यास तक्रार करावी, असेही त्यांनी नमूद केले.

शहर बसमध्ये तिकिटात ज्येष्ठांना सवलतीचा निर्णय चांगला आहे. परंतु, ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये कंडक्‍टर तिकीटच देत नसल्याचे बर्डी ते रामेश्‍वरी मार्गावरील बसमध्ये मी अनेकदा अनुभवले. पैसे घेतात, परंतु तिकीट दिले जात नाही, यावर आळा बसला पाहिजे. 
- डॉ. प्रकाश शास्त्री, ज्येष्ठ नागरिक. 

शहर बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी पुढची आसने आरक्षित करावी. मागे बसल्यास बसमध्ये अनेकदा धक्के बसतात. ते ज्येष्ठ नागरिक सहन करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी चालकाच्या मागे पाच ते सहा आसने आरक्षित करावी. 
- नरेंद्र खंडे, सर्वाधार ज्येष्ठ नागरिक मंडळ, पावनभूमी. 

शहर बसमध्ये आसनांवर स्पष्टपणे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित असल्याचे लिहिले असते. मात्र, नागरिक त्या आसनावर बसतात. ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो, याकडे आधी लक्ष घालावे. कंडक्‍टरही ज्येष्ठ नागरिकांना मदत करीत नाही. 
- डॉ. सोपान माकडे, ज्येष्ठ नागरिक मंडळ, बेसा.

Web Title: nagpur vidarbha news Conductor tickets are not given in the city bus