विद्यार्थिनीशी लगट भोवली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पत्नी निलंबित, प्राध्यापकाला कारणे दाखवा नोटीस

नागपूर - विद्यार्थिनीसोबत लगट केल्याप्रकरणी सेवानिवृत्त न्यायाधीशाने दिलेल्या अहवालाच्या आधारे माफसु प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. तक्रार मागे घेण्यासाठी विद्यार्थिनीवर दबाव टाकणाऱ्या प्राध्यापकाच्या पत्नीला निलंबित करण्यात आले असून, प्राध्यापकासह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. 

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत एमव्हीएससी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीला प्राध्यापक सुरेश जाधव यांनी चर्चासत्रासाठी कर्नाटक येथील सिमोग येथे नेले होते. तिचे विमानाचे तिकीटही जाधव यांनी काढले होते. सिमोगा येथे आपल्या खोलीत घुसून प्राध्यापकाने लगट करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार परत आल्यावर माफसुच्या प्रशासनाकडे केली होती. सुरुवातीला शैक्षणिक नुकसान करू, अशा धमक्‍या देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्राध्यापकाने 
केला. 

जाधव यांच्याकडून होणारा त्रास वाढत गेल्याने अखेरीस हे प्रकरण कुलगुरूंपर्यंत पोहोचले. त्यानंतर याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश श्रीमती खडतकर यांच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीने नुकताच आपला अहवाल माफसु प्रशासनाकडे सादर केला. त्याआधारे कारवाई करण्यात आली, अशी माहिती माफसुच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे लगट करण्याचा आरोप असलेले प्रा. सुरेश जाधव पीएच.डी. करण्यासाठी दुर्ग येथे गेले आहेत.

प्राध्यापकाच्या पत्नीनेही धमकावले 
विद्यार्थिनीला तक्रार मागे घेण्यासाठी प्रा. सुरेश जाधव यांच्या पत्नी एस. डी. बोरकर यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे. तो सिद्ध झाल्याने माफसु प्रशासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. एस. डी. बोरकर या बायोकेमेस्ट्री विभागात आहेत. प्रा. सुरेश जाधव तसेच ते सेवारत असलेल्या परजीवशास्त्र विभागाचे प्रमुख एस. डब्ल्यू. कोलते अशा दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. प्रा. कोलते यांच्या या प्रकरणातील सहभागाविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी विद्यार्थिनीला धमकावल्याची चर्चा आहे.