उभ्या खासगी बसविरोधात कारवाई करा

उभ्या खासगी बसविरोधात कारवाई करा

नागपूर - शहरातील रस्त्यांवर कुठेही उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमुळे अनेकदा नागरिकांना अपघात झाले. या ट्रॅव्हल्स बसविरोधात तत्काळ कारवाई करा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम्‌ यांच्याकडे केली. याशिवाय मीटरने न चालणाऱ्या व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या ऑटोचालकांवर सातत्याने कारवाईची गरजही ग्राहक पंचायतने व्यक्त केली. 

‘खासगी ट्रॅव्हल कंपन्यांची मुजोरी थांबणार का?’ या मथळ्यासह ‘सकाळ’ने २५ डिसेंबर रोजी ठळकपणे वृत्त प्रकाशित करीत शहरातील ट्रॅव्हल्स बसमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघात आदीकडे लक्ष वेधले होते. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ  प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी शिष्टमंडळासह पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम्‌ यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘सकाळ’ने लक्ष वेधलेल्या ट्रॅव्हल्स बसच्या रस्त्यावरील अवैध थांब्यांची यादीच  पांडे यांनी पोलिस आयुक्तांकडे सोपविली. 

ट्रॅव्हल्स बसला फक्त प्रासंगिक कराराची परवानगी असताना सरसकट टप्पा वाहतूक सुरू करण्यात आली असून, रस्त्यांवर कुठेही बस उभी करण्यात येते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून अनेकदा सामान्य नागरिकांचा बळी जात आहे, याकडेही पांडे यांनी लक्ष वेधले. बैद्यनाथ चौक, मानस चौक, भोळे पेट्रोल पंप व इतर ठिकाणी एकामागे एक तीन, चार बसेस उभ्या करून वाहतूक ठप्प करतात. या ट्रॅव्हल्स बसविरोधात कडक कारवाईची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. पोलिस आयुक्तांनी कारवाईचे आश्‍वासन दिले.

ऑटो मीटरने चालत नसल्याबाबत तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाईची मागणीही ग्राहक पंचायतने केली. प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत  दामिनी भरारी पथक तयार करावे, १०० नंबरवर ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी व सूचना केल्यास  त्वरित कारवाई करावी, भूखंड माफियांवर कडक कारवाईसाठी एसआयटी पुन्हा सुरू करावी, या मागणीसह सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांना प्रबोधन आवश्‍यक असून अ. भा. ग्राहक  पंचायत पोलिसांसोबत काम करण्यास तयार असल्याचेही पांडे यांनी सांगितले. शिष्टमंडळात विदर्भ प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटनमंत्री गणेश शिरोळे, महिला प्रमुख तृप्ती आकांत, आय. टी. सेल प्रमुख नरेंद्र कुळकर्णी, शहर सचिव उदय दिवे, अनिल मिश्रा, सतीश शर्मा, विलास ठोसर, संजय चिंचमलातपुरे यांचा समावेश होता.

फुटपाथ मोकळे करणार 
अ. भा. ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केलेल्या फुटपाथवरील अतिक्रमणग्रस्त ४० मुख्य रस्त्यांची यादी पोलिस आयुक्तांना सोपविली. अतिक्रमण काढून पादचाऱ्यांकरिता सर्व फुटपाथ मोकळे करणार असल्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com