बडोद्याच्या तुलनेत दिल्ली वरचढ!

नितीन नायगांवकर
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नागपूर - राजधानी दिल्लीत भरपूर जागा व सोयीसुविधा तर बडोद्याकडे केवळ कार्यकर्त्यांची फौज असल्यामुळे संमेलनासाठी दिल्ली बडोद्यापेक्षा वरचढ ठरत आहे. काही  उणिवा असल्या तरी दिल्लीला वरचढ ठरविण्याच्या दृष्टीनेही पूर्ण प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. महामंडळाच्या स्थळ निवड समितीने अलीकडेच दोन्ही स्थळांना भेटी दिल्यानंतर अनेक बाबी पुढे आल्या आहेत.

नागपूर - राजधानी दिल्लीत भरपूर जागा व सोयीसुविधा तर बडोद्याकडे केवळ कार्यकर्त्यांची फौज असल्यामुळे संमेलनासाठी दिल्ली बडोद्यापेक्षा वरचढ ठरत आहे. काही  उणिवा असल्या तरी दिल्लीला वरचढ ठरविण्याच्या दृष्टीनेही पूर्ण प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. महामंडळाच्या स्थळ निवड समितीने अलीकडेच दोन्ही स्थळांना भेटी दिल्यानंतर अनेक बाबी पुढे आल्या आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी संमेलन दिल्लीलाच होईल, असे चित्र  सध्या आहे. अर्थात अद्याप बडोदा आणि दिल्ली या दोनच स्थळांना निवड समितीने भेटी दिल्या असून हिवरा आश्रमचा (बुलडाणा) आढावा ९ सप्टेंबरला घेण्यात येईल. त्यामुळे १० सप्टेंबरला महामंडळाच्या बैठकीतच निश्‍चित स्थळाची घोषणा होईल. मात्र, घोषणेच्या काउंटडाउनमध्ये दिल्लीच्या बाजूने झुकते माप आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या नेतृत्वात समितीने दोन्ही स्थळांना भेटी दिल्या. दिल्लीला १९ ऑगस्टला समितीने दौरा केला. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयात सचिव असलेले आणि साहित्यात विशेष रुची ठेवणारे ज्ञानेश्‍वर मुळे दिल्लीतील संमेलनासाठी उत्साही असल्याचे कळते. संमेलन दिल्लीला ठरलेच, तर ते स्वतःहून मोठी जबाबदारी स्वीकारतील, हेही निश्‍चित आहे. 
यासोबतच भरपूर जागा, सोयी-सुविधा, कनेक्‍टिव्हीटी या बाबींमध्ये दिल्लीची बाजू अधिक  भक्कम आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, 

आकाशवाणीतून मराठी हद्दपार होणे आदी मुद्यांमुळे संमेलनाचे महत्त्व अधिक आहे. संमेलनांच्या इतिहासात केवळ १९५४ मध्येच दिल्लीकडे यजमानपद आले होते. दुसरीकडे, बडोद्याला मराठी साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. १९०९ आणि १९३४ मध्ये बडोद्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आहे. २००७ मध्ये ऐनवेळी माघार घेतली. पण, यंदा पूर्ण जोर लावण्यात येत आहे. 

समितीची निरीक्षणे
दिल्ली -

शहर व परिसरात मराठी भाषकांची संख्या चार ते साडेचार लाख 
संमेलन झाल्यास पाच हजार साहित्यप्रेमी येण्याची शक्‍यता 
आर्थिक बाजू बडोद्यापेक्षा भक्कम 
भरपूर सोयीसुविधा. मात्र, कार्यकर्त्यांची उणीव

बडोदा -
शहर व परिसरात मराठी भाषकांची संख्या दोन लाख 
संमेलन झाल्यास दीड हजार साहित्यप्रेमी येण्याची शक्‍यता
संमेलनासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज