फवारणी मृत्यूंच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

नागपूर - कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने सुरू असलेल्या मृत्यूसत्राची न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच संबंधित दोषींवर कीटकनाशकांसंबधीच्या कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता. सहा) न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी आणि स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होईल. फवारताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 20 लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते आनंद नारायणराव जम्मू ऊर्फ जम्मू आनंद यांनी ही याचिका दाखल केली आहे. कीटकनाशकांच्या विक्रीतून नफा मिळविण्याच्या उद्देशाने कायद्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने राज्य सरकार, कृषी विभागाचे सचिव, कृषी विभागाचे आयुक्त आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केले आहे.

अशा आहेत मागण्या
मृत्यूंची न्यायालयीन चौकशी व्हावी
विशेष समितीचे गठन व्हावे
स्थानिक यंत्रणेची जबाबदारी निश्‍चित व्हावी
मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाखांची नुकसानभरपाई
बाधितांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची नुकसानभरपाई
दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत
कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपनीची नोंदणी रद्द व्हावी
कीटकशानक विकणाऱ्यांचे दुकान, गोदाम सील करण्यात यावे
कायद्याची अंमलबजावणी व्हावी