२४ तासांत मेडिकलमध्ये १९ मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - दोन दिवसांपासून निवासी डॉक्‍टर सामूहिक रजेवर असल्यामुळे बाह्यरुग्ण विभागापासून तर वॉर्ड रिकामे आहेत. सारे वॉर्ड परिचारिकांच्या भरवशावर आहेत. संपाचा सर्वाधिक परिणाम ऑपरेशन थिऐटरमध्ये दिसून येत आहे. निवासी डॉक्‍टर कर्तव्यावर असताना दररोज मायनर आणि मेजर अशा दीडशेवर शस्त्रक्रिया होतात. परंतु, सोमवारी ५० पेक्षाही कमी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर मृत्यूचा आकडा प्रचंड फुगला. २४ तासांत १९ मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

मेडिकलमध्ये सामूहिक आंदोलन सुरू असल्याने सोमवारी सहायक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी निवासी डॉक्‍टरांना चर्चेसाठी बोलावले. चर्चेत निवासी डॉक्‍टरांना थेट रुजू होण्याचे आदेश दिले. परंतु, निवासी डॉक्‍टरांना सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याबाबत कोणतेही आश्‍वासन दिले  नाही. सरकार सुरक्षेची व्यवस्था करेल तुम्ही रुजू व्हा अशी सक्ती सहायक संचालकांकडून करण्यात आली असल्याचे निवासी डॉक्‍टरांनी सांगितले. यासंदर्भात सहायक संचालक डॉ.  वाकोडे यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही. आमच्या खात्याचे सहायक संचालकच आमची बाजू ऐकून घेत नाही तर आम्ही कोणापुढे न्याय मागणार असा सवाल निवासी डॉक्‍टरांनी केला. यामुळेच सामूहिक आंदोलन कायम आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

मेडिकलमध्ये पहिल्या वर्षाला असलेल्या निवासी डॉक्‍टरांची संख्या १३९ आहे. तर, दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या निवासी डॉक्‍टरांची संख्या १०१ तर तृतीय वर्षाच्या निवासी डॉक्‍टरांची संख्या ९५ आहे. असे एकूण साडेतीनशेवर निवासी डॉक्‍टर संपावर आहेत. दररोज २४ तास कर्तव्यावर तैनात असल्याने मेडिकलची रुग्णसेवा निवासी डॉक्‍टरांच्या भरवशावर आहे. तर दर दिवसाला मेडिकलमध्ये असलेल्या ६ ऑपरेशन थिऐटर (ओटी ए ते ओटी एफ) आहेत. येथील शस्त्रक्रिया निवासी डॉक्‍टरांच्या असहकारामुळे होत नाही. 

मेडिकलमध्ये निवासी डॉक्‍टरांना सुरक्षा देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सोमवारी १७ सुरक्षारक्षक तैनात झाले आहेत. तर, मंगळवार दुपारपर्यंत आवश्‍यक असलेले ६८  सुरक्षारक्षक नियुक्त केले जातील. परंतु निवासी डॉक्‍टरांनी बंदुकधारी सुरक्षारक्षकच हवे ही अट धरून ठेवू नये. बंदूकधारी सुरक्षारक्षक उपलब्ध झाल्यास नियुक्त करण्यात येतील. सध्या मेडिकलमध्ये ६९ वरिष्ठ निवासी डॉक्‍टर, ३० नोकरीतील निवासी डॉक्‍टर तसेच वरिष्ठ डॉक्‍टर रुग्णसेवेसाठी कर्तव्यावर आहेत. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.