ईएसआयसीतून रेफर टू मेडिकल, सुपर

ईएसआयसीतून रेफर टू मेडिकल, सुपर

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपासून कामगार रुग्णालय दूर; राष्ट्रीय अंधत्व निवारणात नापास 

नागपूर - नाव हेमराज ठाकरे... वय ७६. ‘कंपनीत कामाला होतो. दर महिन्याला पगारातून पैसे कापले जात होते. आयुष्यभर पैसै भरले. त्यावेळी उपचार घेतलेच नाही. निवृत्त झालो. पायावर सूज आली. कामगार रुग्णालयात आल्यानंतर दवाई मिळत नाही. त्वचारोग विभागच बंद आहे. आर्थोच्या डॉक्‍टरने मेडिकलमध्ये पाठवलं.... आता इकडे आलोजी...’ 
दोन ः नाव संजय करमरकर, वय ४७. बुटीबोरीत कामाला आहे. डोळ्यात मोतीबिंदू झाला. उपचारासाठी कामगार रुग्णालयात आलो. मेडिकलमध्ये रेफर केले. 

तीन - नाव विश्‍वास... सोमवारीपेठेतील राज्य कामगार रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी पदावर कार्यरत असलेला कर्मचाऱ्याला ‘ऑन ड्यूटी’ हाताला जखम झाली. सर्जरी विभागात अवघे दोन टाके मारायचे होते. परंतु येथे डॉक्‍टरांनी उपचार न करता जखमेवर बेटॅडिन लावून थेट मेडिकलमध्ये रेफर केले. 

ही व्यथा एक-दोन नव्हे, तर कामगार रुग्णालयात दररोज येणाऱ्या पन्नासावर कामगारांची आहे. येथील त्वचारोग, आर्थोपेडिक, बालरोग, नेत्ररोग विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मेडिकल आणि सुपर स्पेशालिटीचा रस्ता दाखवला जातो. 

गेल्या पाच वर्षांत मोतीबिंदूची एकही शस्त्रक्रिया येथे झाली नाही. तर आकस्मिकरीत्या भरती झालेल्या व मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर येथे उपचारच होत नसल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. 

विशेष असे की, उपचाराच्या नावावर कामगारांच्या वेतनातून कपात होऊन राज्य कामगार विमा योजनेच्या तिजोरीत पैसा जमा होत असताना कामगारांना मेडिकल, सुपरमध्ये रेफर करण्यात येत असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. येथील ॲम्बुलन्स तीन महिन्यांपासून बंद आहे. पाच वर्षांपासून दोन वॉर्ड बंद आहेत. कर्मचारी भरती बंद असल्याने येथे कायमस्वरूपी १८० पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी हे रुग्णालय मरणासन्न अवस्थेला आले आहे. 

अशी आहे योजना
केंद्रीय कामगार विमा योजनेचे प्रारूप १९४८ मध्ये तयार करण्यात आले. मात्र, १९५४ मध्ये खऱ्या अर्थाने ही योजना लागू झाली. कामगारांना आरोग्यसेवा प्रदान करण्याचा हेतू यामागे आहे. राज्यात १४ लाखांवर विमाधारक कामगार आहेत. 

ईएसआयसीतून रेफर टू मेडिकल, सुपर
योजनेसाठी कामगारांच्या वेतनातून १.७५ टक्के आणि कंपनी मालकाकडून ४.७५ टक्के रक्कम कपात केली जाते. योजना लागू झाल्यापासून हा निधी कर्मचारी विमा महामंडळाकडून राज्य कामगार विमा योजनेच्या तिजोरीत जमा केला जातो. पूर्वी प्रतिकामगार १५०० रुपये मिळत होते. आता यात वाढ होऊन दोन हजार रुपये वार्षिक मिळतात. विशेष असे की, १४ लाख कामगारांवर खर्च होणारा आगामी सहा महिन्यांचा निधी एकाच वेळी जमा होतो. तरीदेखील कामगारांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागते. 

वेतनातून कपात होणारा पैसा जातो कुठे?    
विदर्भात १ लाख ६० हजार विमाधारक कामगार आहेत. या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सांभाळण्यासाठी नागपुरात सोमवारीपेठेत एकमेव राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आहे. येथे सोयींचा अभाव असल्याने पॅनेलवर सुमारे २० खासगी रुग्णालये संलग्न करण्यात आली. परंतु या संलग्न रुग्णालयात उपचारासाठी रेफर न करता कामगार रुग्णालयातील डॉक्‍टर मेडिकल आणि सुपरमध्ये रेफर करीत आहेत. सरकारी रुग्णालयातच रेफर करण्यात येत असल्याने कामगारांच्या वेतनातून कपात होणारा पैसा जातो कुठे? हा सवाल कामगार नेते मुकुंद मुळे यांनी केला आहे. गंभीर रुग्णांना तत्काळ रुग्णसेवा देण्यात तत्पर नसल्याने ‘मेडिकल रेफर’ची लागण झाली आहे. 

डॉक्‍टर बनले प्रशासक  
डॉक्‍टरांवर आरोग्य विभागाच्या प्रशासनाने प्रशासनाचा भार दिला. वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार दिला डॉ. मीना देशमुख यांना. त्या रुग्णसेवेपासून दुरावल्या. यानंतर डॉ. गिरिजा धवड यांच्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यभार देण्यात आला. तर निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. भावना चौधरी यांची नियुक्ती केली. या तिन्ही महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कामगार रुग्णालयाचा प्रशासकीय कार्यभार आहे. इतर कायमस्वरूपी डॉक्‍टरांमध्ये नेत्ररोग विभागात डॉ. गुप्ता, सर्जरी रोग विभागात डॉ. नरेंद्र कोडवते, डॉ. हेमनानी, स्त्रीरोग विभागात डॉ. अंजली भांडारकर, भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. दलाल कार्यरत आहेत. इतर सारे डॉक्‍टर बंधपत्रित आहेत. कामगार रुग्णालयातील महिलांच्या प्रशासनात सारी रुग्णसेवा बंधपत्रित डॉक्‍टर आणि दुपार आणि रात्रीची रुग्णसेवा परिचारिकांच्या भरोशावर असल्याचे चित्र येथे दिसून येते. 

ॲम्बुलन्स तीन महिन्यांपासून बंद 
सीजी काढतो चतुर्थश्रेणी कर्मचारी
बंधपत्रित डॉक्‍टरांच्या भरोशावर सेवा 
परिचारिकांची संख्या तोकडी 
३३२ पैकी १८० पदे रिक्त 
कामगारांना मिळेना रुग्णसेवा

कामगारांचे आरोग्य सांभाळण्यासाठी १९७० मध्ये नागपुरात कामगार रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वार्षिक अंदाजपत्रकानुसार सुमारे साडेबारा कोटींवर रुपये शासनाकडे जमा होतात. आकस्मिकरीत्या भरती झालेल्या व मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर येथे उपचारच होत नाहीत, हे विदारक वास्तव आहे.
- मुकुंद मुळे, कामगार नेते 
 

अग्निशमन यंत्रे मुदतबाह्य
कधी कोणत्या कारणामुळे रुग्णालयात आग लागेल हे सांगता येत नाही. परंतु कामगार रुग्णालयातील औषधालय, एक्‍स रे विभाग तसेच इतरही परिसरात लावण्यात आलेले अग्निशमन यंत्रे (सिजफायर) मुदतबाह्य झाली आहेत. तीन महिला डॉक्‍टर येथे प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यापैकी एकाचीही नजर मुदतबाह्य झालेल्या सिजफायर यंत्रांकडे अद्याप गेली नाही. २२ जुलै २०१७ रोजी सारी अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाली आहे, हे विशेष. 

जिल्ह्यात अडीच हजारांवर उद्योग

नागपूर जिल्ह्यात लहान-मोठे अडीच हजार उद्योग आहेत. यात सुमारे दीड लाख कामगार उद्योग व कारखान्यात काम करतात. त्यांचे आरोग्य कामगार रुग्णालयावर अवलंबून आहे. अनेक कारखान्यात शिसे, फॉस्फरस, सफ्लाइन, बेंझिन, मॅंगनीज इत्यादी घातक रसायने व नायट्रेटच्या धुरामुळे कामगारांना छातीचे तसेच त्वचेचे आजार होतात. दररोज पाचशेवर रुग्णांची नोंद कामगार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात होते. परंतु, यातील सर्दी, पडसे, तापाचे आणि प्रसूती विभागात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. 

१८० पदे रिक्त
सहा वॉर्ड असलेल्या या रुग्णालयात कधी अडीचशे खाटा होत्या. डॉक्‍टर, परिचारिका, तंत्रज्ञ, लिपिक, सफाई कामगार व परिचर असे एकूण ३३२ मंजूर कर्मचारी होते. यातील १८० पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने परिचारिका, सफाई कामगार, परिचर, तंत्रज्ञांची पदे आहेत. अल्प पदांच्या भरोशावर सोमवारीपेठेतील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अलीकडे एजन्सीमार्फत कंत्राटावर पदे भरण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com