लेटलतीफ कर्मचाऱ्यांमुळे परीक्षा विभाग ‘नापास’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

जनमंचने केली परीक्षा विभागाची पाहणी - अधिकाऱ्यांच्या कक्षात पंखे, एसी सुरूच

नागपूर - दफ्तर दिरंगाई, लेटलतिफी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे घनिष्ठ नाते मंगळवारी (ता. १८) जननमंचने केलेल्या पाहणीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले. जनमंचने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रविनगरस्थित परीक्षा भवनमध्ये केलेल्या पाहणी दौऱ्यात वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणे ही नित्याचीच बाब असल्याचे आढळले.

जनमंचने केली परीक्षा विभागाची पाहणी - अधिकाऱ्यांच्या कक्षात पंखे, एसी सुरूच

नागपूर - दफ्तर दिरंगाई, लेटलतिफी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे घनिष्ठ नाते मंगळवारी (ता. १८) जननमंचने केलेल्या पाहणीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले. जनमंचने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रविनगरस्थित परीक्षा भवनमध्ये केलेल्या पाहणी दौऱ्यात वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणे ही नित्याचीच बाब असल्याचे आढळले.

एलआयटी परिसरात असलेल्या परीक्षा भवनाच्या प्रवेशद्वारावरच कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते ते सायंकाळी ५.४५ दिलेली आहे. मात्र, ११ वाजले तरीही ना सहायक कुलसचिव कक्षात असतात ना अधीक्षक, बाबू त्यांच्या टेबलवर. जनमंचचे उपाध्यक्ष ॲड. मनोहर रडके यांच्या नेतृत्वात जनमंच टीमने सामान्य परीक्षा शाखा, व्यावसायिक परीक्षा शाखा, फेरमूल्यांकन विभाग, पीएचडी विभाग, परीक्षा नियंत्रकाचे कक्ष तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तयार केलेली एक  खिडकी योजना विभागाची पाहणी केली. यामध्ये विभागातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येतात की नाही याची ‘ऑन द स्पॉट’ तपासणी केली असता अधिकारी जागेवर नसतानाही त्यांच्या कक्षातील दिवे, पंखा, एसी व कूलर सुरू असल्याचे आढळले.

सकाळी १० वाजता कार्यालयात पोहोचण्याची वेळ असली तरी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त १० मिनिटे वेळ देण्यात येते. यानुसार सकाळी १० वाजून १० मिनिटाला कर्मचाऱ्याची उपस्थिती पाहिली असता सर्व विभागांमध्ये ९० टक्के कर्मचारी अनुपस्थित होते. जनमंच टिममध्ये प्रल्हाद खरसने, राम आकरे, राजेश किलोर, टी. बी. जगताप, विठ्ठल जावळकर, अशोक कामडी, श्रीकांत दौड, किशोर गुल्हाने, राहुल जाडे, बाबा राठोड, उत्तम सुळके, गणेश खर्चे आदी होते.

विभागामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल पाठविण्यात येतो. त्यानुसार योग्य ती कारवाई होते. परीक्षा विभागातील सर्व उणिवा एका रात्रीत दूर होणार नाही.
- नीरज खटी, परीक्षा नियंत्रक, नागपूर विद्यापीठ.

सीसीटीव्ही बिनकामाचे
परीक्षा भवनमध्ये आजघडीला असलेले सीसीटीव्ही केवळ ‘शोपीस’ आहेत. यावर दस्तुरखुद्द परीक्षा नियंत्रक नीरज खटी यांनी दिलेल्या माहितीनुसार डिजिटल सीसीटीव्हीसाठी नव्याने प्रस्ताव पाठविला आहे. यानुसार नवीन ८० सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. सध्या असलेले सीसीटीव्ही बिनकामाचे असून, त्यातील बहुतांश बंद अवस्थेत असल्याची कबुली त्यांनी दिली.

परीक्षा विभागाचे गोदाम वाऱ्यावर
अत्यंत गोपनीय व संवेदनशील असलेल्या परीक्षा विभागाच्या गोदामासाठी कुठलीही  सुरक्षाव्यवस्था ठेवलेली नाही. विद्यापीठाचे अत्यंत गोपनीय अशा विभागाकडे दुर्लक्ष झाले आहे. कोऱ्या उत्तरपत्रिका तसेच महत्त्वपूर्ण दस्तऐवज असलेल्या या गोदामाच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक नाही. तसेच विद्यार्थ्यांनी केलेले पीएचडीचे शोधनिबंध जागेअभावी वऱ्हांड्यामध्ये ठेवले आहेत.

यांच्यावर होणार का कारवाई?
पाहणीत सहायक कुलसचिव एस. ए. सयाम, अधीक्षक मनोहर चिमूरकर, अधीक्षक सुनील इंगोले यांच्यासह विविध टेबलवरील कर्मचारी वेळेवर उपस्थित नव्हते. यांच्या विभागामध्ये विचारणा केली असता सकाळी १० वाजता साहेब कधीच येत नसल्याची माहिती मिळाली. मुख्य म्हणजे स्वत: परीक्षा नियंत्रक नीरज खटी हेदेखील वेळेवर येत नसल्याच्या त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. यामुळे कोण कुणावर कारवाई करणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.