विषबाधित शेतकरी दुहेरी ‘इन्फेक्‍शन’च्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता व गैरसोयींमुळे कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झालेले शेतकरी दुहेरी ‘इन्फेक्‍शन’च्या विळख्यात अडकले आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा आणि संवेदनशीलतेच्या अभावामुळे शेतकरी आणि त्यांच्या नातेवाइकांची हेळसांड होत असल्याची निरीक्षणे आरोग्यसेवा तज्ज्ञ व कृषितज्ज्ञांनी ‘सकाळ’कडे मांडली. 

नागपूर - यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता व गैरसोयींमुळे कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झालेले शेतकरी दुहेरी ‘इन्फेक्‍शन’च्या विळख्यात अडकले आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा आणि संवेदनशीलतेच्या अभावामुळे शेतकरी आणि त्यांच्या नातेवाइकांची हेळसांड होत असल्याची निरीक्षणे आरोग्यसेवा तज्ज्ञ व कृषितज्ज्ञांनी ‘सकाळ’कडे मांडली. 

सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यसेवा तज्ज्ञ डॉ. पिनाक दंदे, ज्येष्ठ शेतकरी नेते शरद पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर आणि हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अनिल किलोर यांनी अलीकडेच यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या टर्शरी केअर युनिटला भेट दिली. या भेटीदरम्यान ‘टर्शरी केअर युनिट’ या नावाला साजेशी यंत्रणा अस्तित्वातच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ‘रुग्णालयात प्रवेश केल्यावर अतिदक्षता विभागाच्या दारावर ‘आयसीयू’ असा उल्लेख असलेले आम्हाला कुठेही आढळले नाही. आत डॉक्‍टरांच्या जागेवर पोलिस बसलेले होते. एसी बंद होता. रुग्णांच्या खाटेवर उशा-चादरी, अंगावर पांघरुण नव्हते. जागोजागी घाण होती. आयसीयूमध्येच खाली रुग्णांचे नातेवाईक बसलेले होते. अतिदक्षता विभागाला साजेसे कुठलेही चित्र आम्हाला बघायला मिळाले नाही,’ असे डॉ. पिनाक दंदे सांगतात. 

आधीच कीटकनाशकातून विषबाधा झालेली असताना रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणखीही वेगवेगळ्या इन्फेक्‍शन्सची शक्‍यता बळावली आहे. ‘हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्‍शन’ असा उल्लेख करतानाच मृतांची संख्या वाढण्यासाठी हे मोठे कारण असू शकते, असा अंदाजही डॉक्‍टर व्यक्त करतात. शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना औषधे व तपासण्यांची व्यवस्था बाहेरून करावी लागणे आणि नातेवाइकांवरच सलाइन बदलण्याची वेळ येणे, ही अत्यंत दुर्दैवी बाबही यावेळी तज्ज्ञांच्या निदर्शनास आली. मुख्य म्हणजे विषबाधेवर तातडीने उतारा कसा करायचा, याचीही  उपाययोजना नसल्याने योग्य उपचाराला विलंब होणे, शेतकरी आणि कुटुंबीयांचे समुपदेशन न होणे, रुग्णांना सकस आहार न मिळणे, भरती होणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार न होणे यांसारख्या अनेक बाबी विषबाधित शेतकऱ्यांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत, असेही डॉ. दंदे म्हणाले. अनेक शेतकऱ्यांना डोळ्यालाही विषबाधा झालेली आहे. पण, डोळ्यात टाकण्यासाठी साधे ड्रॉप्सही रुग्णालयात उपलब्ध नाहीत, ही बाबही त्यांच्या निदर्शनास आली. 

‘डेथ ऑडिट आवश्‍यक’
‘शेतकऱ्यांना कीटकनाशकांतून विषबाधा झाली हे सिद्ध झाले असले, तरी मृत्यूंची कारणे शोधण्यासाठी ‘डेथ ऑडिट’ होणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे मत डॉ. पिनाक दंदे यांनी व्यक्त केले. ‘विष प्राशन केल्याने होणारा मृत्यू आणि विषबाधा झाल्यामुळे होणारा मृत्यू या दोन्हींमध्ये फरक आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तीचा एकाएकी मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. अशा स्थितीत उपचाराला झालेला उशीर आणि हलगर्जीपणादेखील मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतो. ‘डेथ ऑडिट’च्या माध्यमातून सगळ्या शक्‍यता तपासण्याची गरज आहे. प्रशासनाने उच्चस्तरीय वैद्यकीय समिती स्थापन केली, तर अहवालातील बाबी, नव्याने भरती होणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपचारासाठी उपयोगी ठरू शकतील,’ असा उपाय डॉ. दंदे यांनी सुचविला.