आदिवासींनो, इंग्रजांच्या वतीने मी क्षमा मागतो! - फेलिक्‍स पेडल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नागपूर - ‘भारतावर राज्य करताना ब्रिटिशांनी काही चांगल्या गोष्टी दिल्या, पण त्याचवेळी भांडवलशाही रुजवून मोठे नुकसान केले. आदिवासींवरील अन्यायाची सुरुवात ब्रिटिशांनीच केली. दुर्दैवाने एवढा काळ लोटला तरी अन्याय थांबलेला नाही,’ असे प्रतिपादन करतानाच ‘आदिवासींनो, इंग्रजांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो’ असे भावोद्‌गार मानव उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे चार्ल्स डार्विन यांचे खापरपणतू फेलिक्‍स पेडल यांनी आज (बुधवार) येथे काढले. 

आदिवासी मंचच्या वतीने अकराव्या विश्‍व आदिवासी अधिकार दिनानिमित्त आयोजित सभेत ‘आदिवासी जीवनशैली, जीवन मूल्य व संस्कृती’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाचे  ते मुख्य वक्ते होते.

हॉटेल हरदेव समोरील बचत भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, अशोक चौधरी आणि आयोजक दिनेश मडावी यांच्यासह आदिवासी समाजातील नेत्यांची उपस्थिती होती. फेलिक्‍स पेडल हे स्वतः मानववंशशास्त्रज्ञ असून जगभरातील आदिवासी जमातींसंदर्भात त्यांचा विशेष अभ्यास आहे. ते म्हणाले, ‘इंग्रजांनी वनविभागाची निर्मिती करून आदिवासी आणि निसर्गामध्ये फूट पाडली. भांडवलशाही लादून आदिवासींचे लोकजीवन नष्ट केले. तेव्हा आणि आताही धरणे बनविताना हजारो आदिवासी गावे नष्ट होत आहेत. आदिवासींनी आंदोलने उभी केली नसती तर आज अर्ध्यापेक्षा अधिक जंगले उद्योगांनी व्यापली असतील. जंगले कुणाची व्यक्तिगत संपत्ती नसली, तरी आदिवासींची सामूहिक संपत्ती नक्कीच आहे. त्यांच्याकडून जंगलांचाच अधिकार काढून घेतल्यामुळे अन्यायाची मालिका आजही सुरू आहे.’ ‘आदिवासींवर जगाचे भवितव्य अवलंबून आहे, असा निष्कर्ष भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह विविध देशांमधील आदिवासींचा अभ्यास केल्यानंतर मी काढू शकलो. शिक्षणात आदिवासी मागे आहेत, असो म्हणतो. पण त्यासाठी शिक्षण पद्धती कारणीभूत आहेत. अभ्यासक्रमात आदिवासी भाषा, संस्कृती, अर्थशास्त्राचा समावेश आवश्‍यक होता. आदिवासींच्या भाषेत प्रगाढ ज्ञान दडले आहे. हा जगातील सर्वाधिक लोकशाहीवादी समाज आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे,’ अशी खंतही फेलिक्‍स पेडल यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी व्हायोलिनवर ऑस्ट्रेलियातील आदिवासी लोकगीत सादर केले.

Web Title: nagpur vidarbha news felix pedal talking