एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार

एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार

अंड्रस्कर-वांढरे कुटुंबीयांवर शोककळा

नागपूर - काश्‍मिरातील गुलमर्गमध्ये केबलकारच्या अपघातात मृत्यू पावलेल्या अंड्रसकर कुटुंबातील चौघांचे मृतदेह सोमवारी सायंकाळी नागपुरात स्वगृही आणण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मोक्षधाम घाटावर शोकाकुल वातावरणात चौघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतिम निरोप देताना उपस्थितांना गहिवरून आले होते.

शासनाने दाखविले गांभीर्य
प्रा. अंड्रसकर कुटुंबीयांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर जम्मू-काश्‍मीर शासनाने सर्वतोपरी मदत केली. जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागातील एजन्सीने पवन सिंग यांना मृतदेहांसोबत महाराष्ट्रात पाठवले. तेथील कागदपत्रांची पूर्तता सिंग यांनी शासनाच्या मदतीने केली. चौघांचेही मृतदेह नागपुरात आणल्यानंतर महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने ताबडतोब मदत पुरविली. त्यामुळेच विमानाने सोमवारी सायंकाळपर्यंत मृतदेह नागपुरात पोहोचले. अंड्रसकर आणि वांढरे कुटुंबीयांनी जम्मू-काश्‍मीर आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

जमावाचेही पाणावले डोळे
प्रा. जयंत आणि मनीषा यांचे मृतदेह विमानतळावरून सायंकाळी सहा वाजताच्या जुना सुभेदार ले-आउटमधील अंड्रसकर यांच्या घरी आणण्यात आले. मात्र, दुसरी ॲम्बुलन्स केवळ १५ मिनिटाच्या अंतराने तेथे पोहोचली. हवाबंद असलेल्या एकाच शवपेटीत सात वर्षीय जान्हवी आणि चार वर्षीय अनघा या दोघींचे मृतदेह पोहोचले. दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला, तर जमावाच्यांही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

भावाने दिला मुखाग्नी
प्रा. अंड्रसकर यांचा पत्नीसह मुलींचाही मृत्यू झाल्यामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्‍ती या नात्याने भाऊ सतीश अंड्रसकर यांनी मुखाग्नी दिला. लहान भावासह पुतणींनाही अग्नी देण्याची वेळ सतीश यांच्यावर आली. 

२७ हजार रुपयांचा भुर्दंड
जम्मू काश्‍मीर टूरिझमच्या वतीने पवन सिंग सोढी यांना चारही मृतदेहांसोबत नागपुरात पाठविण्यात आले. मात्र, शासनाने त्यांचा खर्च अंड्रसकर कुटुंबीयांना करण्यास सांगितले. पवन सिंग यांचे तिकीट तसेच अन्य खर्च मिळून २७ हजार रुपये अंड्रसकर कुटुंबीयांनी नागपूर विमानतळ ॲथॉरिटीकडे जमा केल्याची प्रतिक्रिया सतीश अंड्रसकर यांनी दिली.

फेसबुक अकाउंट झाले मेमोरिअलाइज
मृत्यूनंतर जयंत आणि त्यांच्या पत्नीचे फेसबुक अकाउंट मेमोरिअलाइज झाले होते. या दाम्पत्याने हयात असतानाच फेसबुकवर उपलब्ध फाॅर्म भरून भविष्यात मृत्यूनंतर अकाउंट मेमोरिअलाइज करण्याचे ऑप्शन निवडले होते. त्यामुळे या घटनेनंतर दोन्ही अकाउंटवर ‘रिमेम्‍बरिंग’ या शब्दाचा उल्लेख झाला. त्यांनी शेवटची पोस्ट पहलगाम येथून केली. आता याच पोस्टखाली कमेंटमध्ये नातेवाईक आणि मित्रांनी श्रद्धांजली वाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com